मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : ‘वंदे भारत’चा शानदार उद्घाटन सोहळा
मडगाव : कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाल्यावर गोवा-मुंबई हे अंतर अवघ्या पाच तासात पूर्ण करणे शक्य असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मंगळवारी दिली. सर्वांना उत्कंठा लागून राहिलेल्या ‘वंदे भारत’ सेमी हायस्पीड ट्रेनच्या शुभारंभ समारंभात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील राणी कमलापती स्टेशनवरून एकाच वेळी पाच वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन केले. त्यात गोवा-मुंबई, बेंगळुरू-हुबळी-धारवाड, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर, भोपाळ-जबलपूर या वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे.
मडगाव कोकण रेल्वे स्थानकावर झालेल्या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकामंत्री रवींद्र चव्हाण, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, आमदार दिगंबर कामत तसेच कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, मुख्य सचिव पुनित गोयल इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, मडगाव कोकण रेल्वेस्थानक हे गोव्यातील मुख्य रेल्वेस्थानक असल्याने या रेल्वेस्थानकाला पंचतारांकीत साज चढविला जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. सद्या रेल्वेस्थानकाच्या परिसरात सौंदर्यीकरणाचे काम जीएसआयडीसीकडून हाती घेण्यात आले असून ते टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाणार आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यावर दाबोळी विमानतळ बंद पडणार असल्याच्या अफवा उठविण्यात आल्या होत्या. परंतु, आज दोन्ही विमानतळ जोरात सुरू आहेत व असंख्य पर्यटक गोव्यात येत आहेत. मोपा विमानतळावरून देशातील सर्व प्रमुख शहरे जोडली जातील तसेच आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
मोदींकडून गोव्याला प्राधान्य
गोव्यातून वंदे भारत सुरू व्हावी अशी तमाम गोवेकरांची इच्छा होती. ही इच्छा केंद्र सरकारने पूर्ण केली आहे. गोवा हे जरी छोटे राज्य असले तरी त्याची कीर्ती मोठी आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच गोव्याला प्राधान्य दिले आहे. आत्ता वंदे भारत ट्रेन उपलब्ध करून त्यावर शिक्कामोर्तब केल्याचे उद्गार आमदार दिगंबर कामत यांनी काढले.
पर्यटनासाठी ‘वंदे भारत’ महत्वाची
‘देखो अपना देश’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार मोपा विमानतळावरून देशातील सर्व प्रमुख शहरांना जोडण्यात आले. आत्ता वंदे भारत ट्रेनच्या सेवेमुळे गोव्यात तसेच कोंकणात येणाऱ्या पर्यटकांना अधिक सोयीस्कर होईल असे उद्गार पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काढले. वंदे भारत एक्सप्रेस सोफ्टवेअरद्वारे नियंत्रित करण्यात आल्याने प्रवाशांना रेल्वे प्रवासाचा आनंद मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र, गोव्यासाठी महत्वाचा दिवस
पंतप्रधान नरेंद मोदीच्या नेतृत्वामुळे गेल्या 9 वर्षांमध्ये साधनसुविधांचं जाळं संपूर्ण देशभरात जोडलं गेलं आहे. आज वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ होत आहे हा महाराष्ट्र व गोव्यासाठी महत्वाचा दिवस असल्याचे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकामंत्री रवींद्र चव्हाण यावेळी म्हणाले. गोवा हे पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे मुंबईतून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सुविधा प्राप्त व्हायला पाहिजेत. त्यात वंदे भारतमुळे प्रवासाची चांगली सेवा मिळणार असल्याचे चव्हाण म्हणाले.
गोव्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून महत्वाचा दिवस
वंदे भारत ही देशी बनावटीची ट्रेन असून ती सेमी हायस्पीड ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये अनेक सुविधा उलपब्ध करण्यात आलेल्या आहेत. वंदे भारतमुळे पर्यटन क्षेत्राबरोबरच व्यापार व उद्योग क्षेत्राला देखील बळ मिळणार असल्याने आजचा हा दिवस गोव्यासाठी महत्वाचा असल्याचे केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले. यापूर्वी देशात 13 वंदे भारत एक्सप्रेसला प्रारंभ झाला होता. त्यात आणखीन पाच ट्रेनची भर पडल्याने ही संख्या 18 वर गेली आहे. आगामी काळात वंदे भारतची संख्या 400 च्या घरात जाईल. संपूर्ण देशभरात वंदे भारत एक्सप्रेसची सेवा उपलब्ध करण्यात येईल. सद्या वंदे भारतला स्लीपर कोचची सेवा नाही. पण, आगामी काळात स्लीपर कोच सेवा ही उपलब्ध केली जाईल असे नाईक म्हणाले.
विद्यार्थी व पत्रकारांनी केला वंदे भारतमधून प्रवास
उद्घाटन समारंभानंतर मुंबईकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमधून मडगाव परिसरातील तीन शाळांचे विद्यार्थी तसेच पत्रकारांना थिवी रेल्वेस्थानक पर्यंत प्रवास करण्याची संधी मिळाली. राज्यपाल पिल्लई तसेच महाराष्ट्राचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील वंदे भारत प्रवासाचा आनंद घेतला. राज्यपाल करमळी स्थानकावर उतरले तर चव्हाण पुढच्या प्रवासाकडे रवाना झाले. वंदे भारत एक्सप्रेसच्या अत्याधुनिक वैशिष्ठ्याची माहिती या प्रवासादरम्यान मिळाली. रेल्वेत हायफाय सेवा, अंध व्यक्तीसाठी सुविधा, स्वच्छ व प्रशस्त असे शौचालय, 360 अंशात फिरणारी आसने, स्वयंचलित दरवाजे अशा अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.









