प्रतिनिधी / पणजी
कोरोना काळाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर आशयसंपन्न व दर्जेदार चित्रपटांचा नजराणा घेऊन येणाऱया विन्सन वर्ल्डचा पंधरावा गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे बिगुल आज शुक्रवार दि. 5 पासून ते दि. 7 रोजीपर्यंत वाजणार आहे.
गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते सायं. 5.30वा. आयनॉक्स पणजी येथे होणार आहे. यावेळी क्रीडा व कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, पणजी मनपाचे महापौर रोहित मोन्सेरात, आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ उपस्थित राहणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची मांदियाळीही या महोत्सवात असणार आहे. दरवर्षी या महोत्सवाला अनेक सिनेरसिकांकडून उदंड प्रतिसाद लाभतो आणि यंदाही असाच प्रतिसाद लाभेल अशी आशा आयोजकांमार्फत व्यक्त केली जात आहे. या महोत्सवातून मराठी सिनेसृष्टीतील तारे तारका, दिग्दर्शकांचा सहभाग व दर्जेदार चित्रपटांची पर्वणी सिनेरसिकांना मिळत असते.
‘सहेला रे’ चित्रपटाने उघडणार पडदा
उद्घाटन सोहळय़ानंतर ‘सहेला रे’ ह्या सिनेमाचा वर्ल्ड प्रिमियर शोने महोत्सवाचा पडदा उघडणार आहे. ह्या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद व दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी याचं असून त्यांच्यासह सुमित राघवन, सुबोध भावे यांच्या प्रमुख भुमिका आहेत. कॉलेजचा माजी विद्यार्थी मेळावा जो अशा दोघांना एकत्र आणतो जे काही दशकांपासून संपर्कात नव्हते. त्यांनी आता वेगवेगळय़ा साथीदारां सोबत लग्न केले आहे.माजी विद्यार्थी मेळाव्या मधील भेट त्या दोघांना वर्तमान तसेच भूतकाळात त्यांनी एकत्र घालवलेले क्षण आणि त्यानंतर बदलत गेलेले आयुष्य याचा जीवनपट त्यांच्या डोळय़ा समोर तरळतो. सहेला रे हे “जर तरच’’ किंवा गालिबने म्हटल्याप्रमाणे, यूं होता तो क्मया होता याचे मार्मिक प्रतिबिंब आहे.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘कृतज्ञता पुरस्कार’
महोत्सवाच्या उद्घाटन सोहळय़ामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतले नामवंत अभिनेता अशोक सराफ यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानपत्र देवून कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात येईल. या समयी अशोक सराफ यांच्या पत्नी व गुणी अभिनेत्री निवेदिता सराफ याही व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. ज्ये÷ अभिनेते आणि मराठी नाटय़-चित्रपटसृष्टीतील महानायक अशोक सराफ यांनी अनेक दशकं मराठी रसिक प्रेक्षकांचे आपल्या अभिनयाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले. बहुरंगी, बहुरूपी व बहुढंगी अशी त्यांची अजस्त्र कारकीर्द. यंदा त्यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली आहे. तसेच त्यांचे गोव्याशी खास नातं आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात त्यांचा कृतज्ञता सन्मान देवून गौरव करण्यात येणार आहे.
मराठी दिग्गज कलाकारांची असणार मांदियाळी
दरवषीप्रमाणे यंदाही मराठी चित्रपट जगतातील मान्यवर कलाकार महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. नीना कुलकर्णी, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, उमेश कामत, प्रसाद ओक, मंजिरी प्रसाद ओक, आदिनाथ कोठारे, अमृता खानविलकर, गजेंद्र अहिरे, संजय जाधव, किशोर कदम, मृण्मयी गोडबोले, सुव्रत जोशी, मिलिंद गुणाजी, मयुर बोरकर, प्रियदर्शन जाधव, मोहन आगाशे, आदी मान्यवर कलाकार यंदा तीनही दिवस महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवात 21 चित्रपट व चार प्रीमियर शो
ह्या महोत्सवात एकूण एकवीस मराठी सिनेमा व कान्स महोत्सवात जावून आलेला कोंकणी लघुपट ‘वागरो’ प्रदर्शित होणार आहे. नामवंत गोमंतकीय अस्थिरोगतज्ञ डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्यावर आधारीत ‘ताठ कणा’ हा सिनेमाही दाखवला जाणार आहे. ह्या प्रयोगाला डॉ. रामाणी स्वतः हजर राहणार आहेत. याशिवाय यंदाच्या महोत्सवात चार नव्या कोऱया चित्रपटांचा प्रिमियर शो असेल. उद्घाटनाला मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘सहेला रे’ चित्रपट असेल तर समारोपाला तानाजी घाडगे दिग्दर्शित ‘पिल्लू बॅचलर’ चित्रपटाचा प्रिमियर शो असेल. तसेच शनिवारी ओंकार बर्वे यांचा ‘दीड’ सिनेमाचा आशिया प्रिमियर व सुहास जोशी यांच्या ‘क्रिप्टो आजी’ सिनेमाचा वर्ल्ड प्रिमियर असेल. हळुहळु हा चित्रपट महोत्सव गोमंतकीयांच्या मनात भरत आहे. विविध विषयांच्या चित्रपटांचा आस्वाद घेण्यासाठी प्रत्येक वर्षी गोमंतकीय सिनेरसिक वाट पाहत असतो. मराठी चित्रपट गोव्यात कमी प्रमाणात दाखविले जात असल्याने यासारख्या चित्रपट महोत्सवातून गोमंतकीय मराठी सिनेरसिक मराठी चित्रपटांचा आनंद मनमुराद लुटतात.









