बेळगाव : गोवा बनावटीच्या दारूची विक्री करणाऱ्यांची अबकारी खात्याने अक्षरश: कंबर मोडली आहे. सातत्याने विविध ठिकाणी कारवाई करून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू जप्त केली जात आहे. शनिवारी रात्री नऊच्या दरम्यान बहाद्दरवाडी येथील एका मारुती सुझुकी इको कारवर कारवाई करून त्यामध्ये ठेवण्यात आलेली 4 लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू अबकारी अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. बहाद्दरवाडी येथील शिवाजी गल्ली येथे थांबलेल्या मारुती सुझुकी इको कार क्र. जीए 03 एच 5948 क्रमांकाच्या वाहनात गोवा बनावटीच्या दारूचा साठा करण्यात आला आहे, अशी माहिती अबकारीचे अधीक्षक विजयकुमार हिरेमठ, उपअधीक्षक रवी मुरगोड यांना मिळाली होती.
त्यानुसार त्यांनी शनिवारी रात्री आपल्या सहकाऱ्यांसह सदर ठिकाणी छापा टाकून कारची झडती घेतली असता त्यामध्ये 153 लिटर दारू आणि 12 लिटर बियर आढळून आली. या प्रकरणाशी संबंधित दोघे आरोपी फरारी झाले असून त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न चालविण्यात आले आहेत. एकूण 4 लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. तालुक्यातील बहाद्दरवाडी गावात अनेक जण गोवा बनावटीच्या दारूची विक्री करत आहेत. दारूविक्रीच्या माध्यमातून ते मालामाल होत असले तरी याचा फटका येथील मद्यविक्री दुकानदारांना सहन करावा लागत आहे. सरकारने मद्यविक्री दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण शुल्क 50 टक्क्यांनी वाढविले आहे. त्याचबरोबर कमी दरात गोवा बनावटीची दारू उपलब्ध होत असल्याने कर्नाटकची दारू खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी होत असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर सरकारचा महसूलदेखील बुडत आहे. स्थानिक पोलीस अधिकारी कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याने अबकारी खात्याचे अधिकारी आता फिल्डवर उतरले आहेत.









