कोल्हापूर प्रतिनिधी
गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी करणारा टेम्पो राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने भोगावतीनजीक सापळा रचून पकडला. यामध्ये 36 लाख रुपयांचे मद्य 10 लाख रुपयांचा टेम्पो असा सुमारे 46 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी संशयित नितिश रमेश तांबोसकर (वय 33, रा. ता. सावंतवाडी, सिंधूदुर्ग) याला ताब्यात घेतल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक रणजित यवलुजे यांनी सांगितले.
याबाबतची माहिती अशी, गोवा बनावटीच्या मद्याची टेम्पोतून राधानगरीमार्गे तस्करी होणार असल्याची माहिती उपायुक्त बी. एच. तडवी यांना मिळाली होती. यानुसार त्यांनी राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकास याबाबतच्या सुचना केल्या. निरीक्षक एस. जे. डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर विभागीय पथकाने भोगावती गावाच्या हद्दीत सापळा रचून टेम्पो ताब्यात घेतला. या टेंपोतून मद्याची वाहतूक सुरु असल्याचे दिसून आले. टेम्पोचालक नितीशला ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी केली. पथकाने टेंपोतून 36 लाख 69 हजार रूपये किमंतीचे 512 बॉक्स आणि 10 लाख रूपये किमंतीचा टेंपो जप्त केला. ही कारवाई दुय्यम निरीक्षक रणजित येवलुजे, अमंलदार विलास पवार, संदीप जानकर, शंकर मोरे, दीपक कापसे, योगेश शेलार यांनी केली. पुढील तपास यवलुजे करीत आहेत.