मिरज :
शहरात गोवामेड दारुच्या तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचे सत्र सुरूच आहे. दोनच दिवसांपूर्वी दोघांवर कारवाई करुन मोठ्या प्रमाणात गोवामेड दारु जप्त केली असता, पुन्हा मिरज-पंढरपूर रस्त्यावर एका अलिशान चारचाकीतून दारुची तस्करी सुरू असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी या कारवाईनंतर धागेदोरे हाती लागताच एका हॉटेलवर छापा मारुन सुमारे अडीच लाख रुपयांचा गोवामेड दारुचा साठा जप्त केला आहे. या कारवाई दोघांना अटक करण्यात आली असून, गुन्ह्यातील चारचाकीसह दारुसाठा असा २२ लाख, चार हजार, ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये अरविंद तानाजी बेडगे (रा. मिरज) आणि अजिंक्य विजय गवळी (रा. मिरज) या दोघांचा समावेश आहे. या गुन्ह्यातील चारचाकी जप्त केली. दरम्यान, संशयीत अजिंक्य गवळी याचे पंढरपूर रस्त्यावर अवनीज नावाने हॉटेल असून, या हॉटेलमध्ये तो दारु विक्री करीत असल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, मिरज-पंढरपूर रस्त्यावर एका हॉटेलकडे गोवामेड दारु जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. संशयीत अरविंद बेडगे हा जाताना दिसला. पोलिसांना संशय येताच चारचाकी थांबवून तपासणी केली.








