नेसरी :
शिपुर तर्फ नेसरीजवळ वाहनांची तपासणी करत असताना चंदगडहून गडहिंग्लजकडे येणाऱ्या कारला थांबून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारुच्या बाटल्यांचे १६ बॉक्स मिळून आले. याबाबत प्रकाश बळीराम चव्हाण (रा. कोणीकोणूर, ता. जत, जि. सांगली) व अनिल विकास सोलनकर (रा. माडग्याळ ता. जत, जि. सांगली) या दोघांना अटक करून वाहनासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कोल्हापूर भरारी प्रथक क्रमांक दोन यांना आलेल्या माहितीनुसार गडहिंग्लज चंदगड रोडवर शिप्पूर तर्फ नेसरी गावाजवळ वाहनांची तपासणी करीत असताना कारमध्ये गोवा बनावटीच्या मद्याच्या बाटल्यांचे १६ बॉक्स आढळून आले असून यात सांगली जिल्ह्यातील प्रकाश चव्हाण व अनिल सोलंकर या दोघांना अटक करून गडहिंग्लज न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. यानंतर पुढील तपासाकामी पथक जत (जि. सांगली) येथे रवाना झाले आहे. यामध्ये प्रकाश चव्हाण यांच्या कोणीकोनुर या गावी हॉटेल गोटू (जान्हवी) मध्ये तपास केला असता त्या ठिकाणी गोवा बनावटीच्या एका नामवंत कंपनीच्या १८० मिलीच्या ३२ सीलबंद बाटल्या मिळून आल्या. तसेच हॉटेलमध्ये चिटकवण्याकरिता वापरले जाणारे बनावट एक हजार लेबल, महाराष्ट्र राज्यांमध्ये विक्रीस असलेल्या एका नामवंत कंपनीच्या १८० मिलीच्या दोन हजार बनावट लेबल व बाटल्यांच्या टोपणावर लावण्यासाठी वापरण्यात येणारे घोषवावय असलेले ५०० बनावट प्लास्टिक स्टिकर मिळून आले आहे.
संशयित हे गोवा बनावट दारूच्या बाटलीवर चिटकवलेले लेबल काढून त्या बाटलीवर ‘महाराष्ट्र विक्री करता’ असलेले बनावट लेबल चिटकवून तसेच बाटलीचा टोपणावर महाराष्ट्रात असे स्टिकर चिकटवून महाराष्ट्र राज्याच्या दराने विक्री करत होता. सदर लेबल व स्टीकर चिटकवल्याने बाटली ही हुबेहूब महाराष्ट्र राज्य करताच विक्रीस असल्यासारखी वाटत होती.
सदरचे स्टिकर व लेबल हे संकेत संजय मुळावरकर (रा. जोडभावी पेठ ता. सोलापूर) यांच्याकडून घेतले असल्याचे चौकशी दरम्यान पुढे आले आहे. त्यामुळे पुढील तपासाकामी पथक संजय यांच्याकडे चौकशी करता गेले असता लेबल व स्टिकर हे संकेत मुळावरकर हा विलास पोतू (रा. घोंगडे वस्ती सोलापूर) यांच्याकडून घेत असल्याचे चौकशी दरम्यान उघड झाले आहे. गोवा येथील वसंत जगन्नाथ मलिक यांच्याकडून दारु खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या कारवाईमुळे गोवा बनावट दारूवरील लेबल काढून त्यावर महाराष्ट्र राज्याचे लेबल चिकटवून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करून तसेच मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडवून महाराष्ट्र राज्याच्या दराने विक्री करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या गुन्ह्यात ६ लाख ८६ हजार ६४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये निरीक्षक संजय शिलेवंत, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, संदीप जाधव, नरेश केरकर, देवेंद्र पाटील, आशिष पवार आदर्श धुमाळ, सुशांत पाटील यांचा सहभाग आहे. तपासकामी राज्य उत्पादक शुल्क निरीक्षक प्रभात सावंत, चेतन वंगुथनी, श्री. पांढरे, श्रीमती सलगर यांचे सहकार्य लाभले.








