गांधीनगरजवळ गांजा सेवन करणाऱ्यालाही अटक
बेळगाव : तांगडी गल्ली येथील एका घरावर छापा टाकून दीड लाख रुपये किमतीची 109 लिटर 140 मिली इतकी गोवा बनावटीची दारू अबकारी अधिकाऱ्यांनी जप्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दारूविक्री बंदीचा आदेश होता. त्यावेळी हा साठा साठवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले आहे. प्रशांत महादेव चव्हाण ऊर्फ बाबू, रा. तांगडी गल्ली याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दारूविक्री बंदीचा आदेश असताना विक्रीसाठी गोवा बनावटीची दारू साठवल्याची माहिती मिळताच अबकारी अप्पर आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, सहआयुक्त एफ. एच. चलवादी, उपायुक्त वनजाक्षी एम. यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी उपअधीक्षक रवी मुरगोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
गांजा सेवन करताना अटक
मंगळवार दि. 15 एप्रिल रोजी सकाळी गांधीनगरजवळ शाहरुख शाहनवाज मोमीन (वय 24) या तरुणाला गांजा सेवन करताना ताब्यात घेण्यात आले आहे. सिगारेटमध्ये गांजा घालून तो सेवन करत होता. त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याने गांजा सेवन केल्याचे आढळून येताच त्याच्यावर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









