समाजाच्या पर्वरी गटातर्फे निषेध व्यक्त
प्रतिनिधी / पणजी
गोवा क्षत्रिय मराठा समाजाचे विद्यमान अध्यक्ष गजानन हळर्णकर हे हेकेखोर पद्धतीने समाजाचे कामकाज चालवत आहेत. त्यांची मनमानी सुरू असून, त्यांच्याकडून आर्थिक गैरव्यवहार होत आहे, असा आरोप समाजाच्या पर्वरी गटातर्फे करण्यात आला. पर्वरी येथील समाज क्षात्रतेज संकुलात कार्यालयासमोर अध्यक्ष हळर्णकर यांच्या विरोधात घोषणा देत त्यांचा निषेध व्यक्त केला.
यावेळी सर्व समाज बांधवाबरोबर विद्यमान कार्यकारी सदस्य तथा माजी अध्यक्ष ऍड. चंद्रकांत चोडणकर, पद्मनाभ आमोणकर, माजी अध्यक्ष व सदस्य मंगेश चोडणकर, सतीश चोडणकर, युवराज साळगांवकर, जगदीश दुर्भाटकर, मधू मालणकर, पेन्ह द फ्रान्स पंचायतीच्या माजी सरपंच राधिका सावंत, विजय केळुस्कर, नीळकंठ नाईक, प्रा. सुनील शेट, प्रा. उमेश कोलवाळकर, विठ्ठल चोडणकर, सौ. उर्मिला साळगांवकर व सौ. अक्षदा वाडेकर उपस्थित होते.
सतीश चोडणकर यांनी स्वागत करून सर्वांना येथील एकूण अध्यक्ष गजानन हळर्णकर यांच्या अध्यक्षतेखालील गैरव्यवहाराचा पाढाच वाचला. तसेच मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहाराची माहिती देत रोख रक्कम घेऊन हॉल बुकिंग करणाऱ्या लोकांना डुप्लिकेट पावती दिली जाते. तसेच येथील संपूर्ण संकुलात एक प्रकारे मनमानीपणा व बेशिस्तपणा वाढल्याचा आरोप त्यांनी केला.
ऍड. चंद्रकांत चोडणकर म्हणाले, आपण सर्व समाज सभासद व बांधवाबरोबर त्यावेळी अथक परिश्र्रम करून एवढी भव्य वास्तू उभी केली होती. तिचा योग्य प्रकारे समाजाच्या हितासाठीच वापर झाला पाहिजे, हा शुद्ध हेतू नजरेत ठेवून सर्वानीच मिळून हे केले होते. पण, सध्या या आर्थिक उत्पन्नाचा विद्यमान अध्यक्ष व त्याच्या पाठीराख्यांकडून गैरव्यवहार चालू आहे. समाजाची योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी ज्येष्ठ समाज बांधवानी पुढाकार घेऊन निधी जमा करून ही वास्तू उभारली आहे. तिचा रीतसर सांभाळून समाज हितासाठीच वापर करावा, अशी अपेक्षा माजी अध्यक्ष मंगेश चोडणकर व आमोणकर यांनी व्यक्त केली. यावेळी सर्व समाज बांधवांनी सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी करून जमाखर्च सादर करावा, असे सांगितले. गेल्या तीन वर्षांपासून सर्व साधारण सभा घेण्यात आली नसल्याचे उपस्थितांनी सांगितले.









