37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोवा सज्ज झाला आहे. गोव्यात पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन होत असून देशभरातील अठ्ठावीस राज्ये व आठ केंद्रशासित प्रदेशांतून दहा हजारांहून अधिक खेळाडू त्यात भाग घेणार आहेत. ऐन पर्यटन हंगामाची सुरुवात जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या या राज्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेने होत आहे. दि. 25 ऑक्टोबर ते दि. 9 नोव्हेंबर या कालावधीत या राष्ट्रीय स्पर्धा होत असून दि. 26 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी फातोर्डा मडगांव येथील नेहरू स्टेडियमवर या स्पर्धेचे उद्घाटन करणार आहेत.
गोव्यात होणारी ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अनेक अर्थांनी वैशिष्ट्यापूर्ण मानली जाते. गेल्यावर्षी गुजरात राज्यात झालेल्या 36व्या क्रीडा स्पर्धेत छत्तीस खेळ प्रकार व देशभरातून आठ हजार खेळाडूंनी सहभाग दर्शविला होता. गोव्यातील यंदाच्या स्पर्धेत तब्बल 43 विविध क्रीडा प्रकारांचा समावेश असून दहा हजारांहून अधिक खेळाडूंचा सहभाग हा विक्रम मानला जाईल. गोव्यासंबंधी बोलायचे झाल्यास, मागील स्पर्धेत गोव्यातून तेरा क्रीडा प्रकारात 81 खेळाडूंनी राज्याचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यात केवळ पाच कांस्य पदकांवर गोव्याला समाधान मानावे लागले. यंदा आपल्याच होम पिचवर ही स्पर्धा होत असल्याने 36 खेळ प्रकारातून तब्बल एक हजाराहून अधिक गोमंतकीय क्रीडापटू मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे पदकांच्या खूप मोठ्या अपेक्षा गोवेकर बाळगून आहेत. यंदाच्या स्पर्धेत केरळ राज्यातील पारंपरिक युद्ध कला असलेली ‘कलारी पायटू’, पंजाब राज्यातील ‘गटका’ हे काही नवीन खेळ या स्पर्धेचे वैशिष्ट्या असतील. ‘लगोरी’ या पारंपरिक देशी खेळाचा प्रदर्शनीय सामना क्रीडाप्रेमींना पाहायला मिळणार आहे. खो खो, मल्लखांब, कब•ाr, कुस्ती या देशी पण प्रचलित खेळांबाबत क्रीडाप्रेमींमध्ये विशेष उत्सुकता लागून राहिलेली दिसते. गोव्यात लोकप्रिय असलेला फुटबॉल खेळ तसेच बीच व्हॉलीबॉल व बीच हॅण्डबॉल तर आहेतच शिवाय जलतरण, नौका नयन आदी जलक्रीडा प्रकारांचाही त्यात समावेश आहे. देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेला नौका नयन हा समुद्री साहसी खेळ प्रकार दोनापावला, मिरामार, शापोरा आदी समुद्र किनाऱ्यावर होणार आहे.
राज्यातील सर्व प्रमुख शहरांना लागून असलेली क्रीडा संकुले व स्टेडियमवर सध्या आयोजनाची जय्यत तयारी पाहायला मिळते. कांपाल पणजी, ताळगाव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम, म्हापसा व फोंडा क्रीडा संकुल या राज्यातील काही प्रमुख क्रीडा प्रकल्पांवर खेळांचे सामने रंगतील. फातोर्डा येथील नेहरू स्टेडियम हे या स्पर्धेचे मुख्य केंद्र असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व क्रीडामंत्री गोविंद गावडे हे दरदिवशी प्रत्येक केंद्राला भेट देऊन अगदी छोट्या-मोठ्या तपशिलाचा आढावा घेत आहेत. सध्या भारतात वर्ल्ड कप क्रिकेट सामने सुरू असले तरी गोव्यातील सर्व माध्यमांवर चर्चा सुरू आहे ती, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची. प्रत्यक्षात 25 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होत असली तरी दि. 19 ऑक्टोबरपासून बॅडमिंटन खेळाने स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यासाठी दोन दिवसांपूर्वीच उत्तराखंड राज्यातील बॅडमिंटन संघ गोव्यात दाखल झाला असून क्रीडामंत्र्यांनी स्वत: दाबोळी विमानतळावर या संघाचे खास गोमंतकीय पद्धतीने अगदी जय्यत स्वागत केले.
पर्यटन व करमणुकीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या गोव्यात क्रीडा स्पर्धेचे प्रयोजन काय, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होऊ शकतो. चित्रपट संस्कृती व निर्मितीची फारशी मोठी पार्श्वभूमी नसलेल्या गोव्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन झाले, त्यावेळीही अनेकांनी अशाच भुवया उंचावल्या होत्या. आज गोवा हे ‘इफ्फी’चे कायमस्वऊपी केंद्र बनले आहे. या चित्रपट महोत्सवामुळे गोव्यात चित्रपट संस्कृती रुजली किंवा बहरली अशातला भाग नाही. चित्रपटाप्रमाणेच गोव्याला फारशी मोठी क्रीडा पार्श्वभूमी नाही. अपवाद काय तो फुटबॉल खेळाचा. येथील चर्चिल ब्रदर्स, धेंपो, साळगावकर यासारखे नामांकित फुटबॉल क्लब राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पारितोषिकांचे मानकरी ठरले आहेत. फुटबॉल खेळाचा चाहतावर्गही मोठा आहे. इंडियन सुपर लीगमुळे ‘एफसी गोवा’चे सामनेही आज गोव्यात होतात. क्रिकेट खेळाबाबत मात्र फारशी प्रगती दिसत नाही. गोव्यातील क्रिकेट खेळाडूंची मजल फारतर रणजी सामन्यापर्यंत व ‘आयपीएल’मध्ये झळकलेले एक दोन खेळाडू, हा त्यातील अपवाद तेवढाच. टेनिस बॉल क्रिकेटचे सामने मात्र येथील गावोगावी रंगताना दिसतात. बुद्धिबळ खेळात महिला ग्रँडमास्टर बनलेल्या भक्ती कुलकर्णी, ग्रँडमास्टर अनुराग म्हामल हे काही सन्माननीय अपवाद वगळल्यास अन्य देशी खेळांबाबत उदासिनताच दिसते.
सांस्कृतिक क्षेत्राकडे येथील विद्यार्थ्यांना जेवढी ओढ आहे, तेवढा उत्साह मैदानी खेळामध्ये दिसत नाही. येथील अभ्यास केंद्रित शिक्षण व्यवस्थेने तर शालेय जीवनात मैदानी खेळांना ‘आऊट’ करून टाकले आहे. मुळात बहुतेक शाळांमध्ये मैदानाची सोयच नसणे, याहून मोठे दुर्दैव नाही. खेळाची आवड असलेले काही पालक आपल्या मुलांना स्वखर्चाने त्याच्या आवडीच्या खेळात प्रोत्साहन देतात, ही त्यातील समाधानाची गोष्ट म्हणावी लागेल. परीक्षांच्या निकालांवर शाळांची गुणवत्ता मापली जाणाऱ्या या व्यवस्थेत क्रीडाप्रकार दुय्यम मानले जात असल्याने त्यातून निपुण खेळाडू उपजणार कसे? ग्रामीण भागातील क्रीडा टॅलंट शोधून त्याला प्रोत्साहन देण्याच्या गोष्टी केवळ बोलल्या जातात. प्रत्यक्ष त्या दृष्टीने प्रयत्न कमीच दिसतात.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी गोव्यात क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याची अशीच एक घोषणा केली आहे. प्रत्यक्षात सरकार त्याविषयी कितपत गंभीर आहे, हे येणारा काळच सांगेल. क्रीडा पर्यटनाला या स्पर्धेमुळे चालना मिळेल, ही जमेची बाजू असून यानिमित्ताने उभारण्यात आलेल्या साधनसुविधांचा फायदाही स्थानिक खेळाडूंना होणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने का होईना, गोव्यात एक चांगली सुरुवात झाली आहे मात्र हा केवळ तात्पुरता उत्सव न राहता त्यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण झाल्यास ते आयोजनामागील खरे फलित ठरेल!
सदानंद सतरकर








