व्हिसाशी संबंधित समस्यांमुळे पर्यटन खात्याचा निर्णय
प्रतिनिधी /पणजी
येत्या 7 ते 9 नोव्हेंबर दरम्यान, लंडनमध्ये होणाऱया वर्ल्ड ट्रव्हल मार्केट इव्हेंटमध्ये गत 20 वर्षांच्या इतिहासात यंदा प्रथमच गोवा पर्यटन खाते सहभागी होणार नाही. व्हिसाशी संबंधित समस्यांचे निराकरण झालेले नसल्याने खात्याने हा निर्णय घेतला आहे.
लंडनमध्ये होणारा हा अग्रगण्य आंतरराष्ट्रीय ट्रव्हल शो असून गेल्या 20 वर्षांपासून गोवा पर्यटन खाते त्यात सहभागी होत होते. यंदा विविध कारणांमुळे त्या परंपरेत खंड पडणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली.
“आम्ही विरोधी पक्षात असताना अशा प्रकारच्या घोळाबद्दल सरकारवर टीका करत होतो. आता आम्ही सत्तेत आहोत. त्यामुळे यंदा या इव्हेंटमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. यूकेमध्ये गोव्यासाठी पर्यटन बाजारपेठ उघडत नाही, तोपर्यंत या निर्णयात बदल होणार नाही, असे ते म्हणाले.
ई – व्हिसा निवडण्याची परवानगी हवी
यूकेमधून भारतात येणाऱया पर्यटकांना ई-व्हिसा निवडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भारतीय पर्यटन उद्योगाने केली आहे. ती पूर्ण होत नसल्यास आम्ही यूकेमधील ट्रव्हल मार्टमध्ये सहभागी होणार नाही. त्यापेक्षा आम्ही पूर्व आशियासह अन्य आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोव्यात नवीन पर्यटनस्थळांचा शोध घेणार आहोत, असे खंवटे यांनी सांगितले.
पर्यटनात गोव्याची स्थिती ‘नाजूक’
गोव्याला सध्या समुद्रपर्यटन स्थळे असलेल्या शेजारच्या राज्यांच्या स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पर्यटनाच्या बाबतीत गोव्याची स्थिती ‘नाजूक’ म्हणावी अशी बनली आहे. त्याशिवाय पर्यटकांना आणि एकुणच पर्यटन उद्योगासाठीही त्रासदायक ठरणाऱया टाउटिंग, हॉकिंग, अनधिकृत बोटिंग यासारख्या अनेक बेकायदेशीर कामांवरही कठोरपणे नजर ठेवावी लागणार आहे. अशा कामांवर सध्या राज्यात बंदी घालण्यात आली असली तरी या चुका सुधारल्या नाहीत तर भविष्यात ’गोवा हे पर्यटकांच्या प्रथम पसंतीचे स्थळ’ ही ओळख पुसून जाऊ शकते. त्याचा पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसू शकतो, असेही खंवटे म्हणाले.









