मनोरंजनाच्या उद्देशाने काही प्रमाणात विक्री : डीजीपी जसपालसिंग यांचा दावा
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात मोठ्या टोळ्या किंवा ड्रग्ज माफिया कार्यरत नसल्याचा दावा गोव्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) जसपाल सिंग यांनी केला आहे. पर्यटन राज्य असल्याने केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने अमलीपदार्थांची काही प्रमाणात विक्री केली जाते, असे ते म्हणाले. गोवा हे मनोरंजनाच्या उद्देशाने उपभोगाचे केंद्र आहे. मात्र माफियांची कोणतीही टोळी आमच्या निदर्शनास आली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पणजी येथे अमलीपदार्थ विरोधी विभाग, समाज कल्याण खाते व गुन्हा अन्वेषण विभागातर्फे कुरिअर व पार्सल सेवा चालकांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पोलीस महासंचालक जसपाल सिंग बोलत होते. यावेळी व्यसपिठावर पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग, एएनसी अधीक्षक राजू राऊत देसाई, गुन्हा अन्वेषण विभागाचे अधीक्षक निधीन वालसन व अन्य मान्यवर उपस्थित होते.
डीजीपी जसपाल सिंग पुढे म्हणाले, किनारपट्टीचा भाग आणि बंदर शिपमेंट सेवा राज्यातील ड्रग्स व्यवसाय चालकांकडून वापरल्या जात नाहीत, हे गोव्याच्या फायद्यासाठी आहे. वर्षानुवर्षे अंमली पदार्थांचा व्यापार आणि पोलिसांचा हस्तक्षेप वाढत असल्याचे संकेत देत सिंग यांनी सांगितले की, 2022 मध्ये जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थ मागील वर्षाच्या जप्तीच्या तुलनेत तीन पट अधिक होता. असेही जस्पलसिंग यांनी सांगितले.
पार्सलच्या आड होणाऱ्या अंमलीपदार्थांच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यातील कुरिअर सेवा चालकांना नार्कोटिक ड्रग्ज डिटेक्शन मशीन देण्याचा विचार आहे, अशी माहिती डीजीपी सिंग यांनी दिली. पार्सलमधून ड्रग्जची वाहतूक करण्यासाठी कुरिअर सेवेचा वापर करणाऱ्या 74 वर्षीय ब्रिटीश नागरिकाच्या अलीकडील प्रकरणाचा हवाला देऊन, संबंधित ऑपरेटरर्सनी सतर्क राहावे. एखाद्याचे संशयास्पद वर्तन दिसल्यास संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी केले.
पार्सल व्यवसायातील ऑपरेटर्स हे पोलिसांचे डोळे आणि कान आहेत. या प्रकरणी माहिती देणाऱ्यांची नावे उघड केली जाणार नाहीत, असे आश्वासन डीजीपी सिंग यांनी दिले. गोव्यात ड्रग्ज व्यवसयात फोफावला तर चांगले पर्यटक राज्यात फिरकणार त्याच पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम होईल, असा इशाराही डीजीपी जस्पलसिंग यांनी दिला आहे.









