विमान प्रवाशांची होतेय मोठी बचत : मोपा विमानतळाला पसंती
बेळगाव : बेळगावमधून दिल्ली व मुंबई या शहरांच्या विमानसेवा बंद झाल्या आहेत. त्यामुळे विमानप्रवासी जवळच्या शहरांमधून या शहरांना विमान प्रवास करीत आहेत. परंतु तिकिटाचा दर पाहता हुबळीपेक्षा गोव्यातून प्रवास करणे परवडणारे असल्याने विमान प्रवाशांची पहिली पसंती गोव्याला मिळताना दिसत आहे. त्यामुळे दररोज शेकडो प्रवासी बेळगाव-गोवा असा प्रवास करून तेथून विमानाने दिल्ली व मुंबई गाठत आहेत. स्पाईस जेट विमान कंपनीने तांत्रिक कारण देत बेळगावमधून सर्व सेवा बंद केल्या. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्ली व आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई या दोन्ही शहरांच्या विमानसेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. बेळगावमधून दररोज 150 ते 200 प्रवासी या मार्गावर प्रवास करतात. त्यामुळे सध्या हे प्रवासी हुबळी व गोव्यामधून विमान प्रवास करताना दिसत आहेत.
बेळगावपासून जवळच गोव्याचे मोपा विमानतळ सुरू झाले आहे. त्यामुळे हुबळीपेक्षाही मोपाला जाणे प्रवाशांना सोयीचे ठरत आहे. बेळगाव ते हुबळी हे 94 कि.मी. अंतर असले तरी बेळगाव ते मोपा हे अंतर 112 कि.मी. आहे. बेळगावमधून आंबोलीमार्गे मोपाला पोहोचता येते. तिकीट दराचा विचार करताही मोपा विमानतळ किफायतशीर ठरत आहे. मागील महिन्यात उद्घाटन झालेले हे विमानतळ बेळगावहून दिल्ली व मुंबईला जाणाऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरू लागले आहे. बेळगावहून खासगी वाहनांनी मोपा विमानतळाला पोहोचून तेथून अत्यंत कमी दरात प्रवासी प्रवास करीत आहेत. हुबळीपेक्षाही हा तिकीट दर अत्यंत कमी असल्याने मागील महिन्याभरात शेकडो प्रवासी गोव्यातून मुंबई व दिल्ली या शहरांना प्रवास करत आहेत. दिल्लीचा विचार करता 3 हजार 756 तर मुंबईला 5 हजार 489 रुपयांची तफावत दिसून येत आहे. तसेच दिवसभरात सात ते आठ विमाने या मार्गांवर असल्यामुळे प्रवाशांना हवे त्यावेळी प्रवास करता येत आहे.









