सरकारी कर्मचाऱ्यांच्या कल्याण योजनांबाबत केली महत्त्वाची चर्चा
प्रतिनिधी/ पणजी
गोवा सरकारी कर्मचारी संघ (जीजीईए) ,पणजीच्या शिष्टमंडळाने शनिवारी रवींद्र भवन, सांखळी येथे मुख्यमंत्री डॉ .प्रमोद सावंत यांच्यासोबत राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या कल्याण योजनांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली.
या बैठकीत, जीजीईएचे अध्यक्ष अभय मांद्रेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे 2020 पासून बंद असलेल्या नवीन गृह बांधणीसाठी आगाऊ रक्कम (एचबीए) योजनेला पुनऊज्जीवित करण्याची मागणी केली. तसेच गोवा राज्य कर्मचारी गट विमा योजना 1996 मध्ये शेवटच्यावेळी सुधारित केलेल्या या योजनेत सुधारणा व वाढ करण्याची आवश्यकता, कर्मचाऱ्यांना मिळणारी रक्कम अत्यंत कमी आहे, आणि ती गेल्या 29 वर्षांपासून नूतनीकरण केली गेलेली नाही यावरही चर्चा करण्यात आली. याशिवाय, अन्य कर्मचाऱ्यांच्या कल्याणाशी संबंधित मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली.
दरम्यान, या मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि संबंधित सुधारणा लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी अध्यक्ष अभय मांद्रेकर यांच्यासह सरचिटणीस समीर नागवेकर, सचिव ऊपेश म्हापसेकर, कीर्ती वायंगणकर, कार्यकारी सदस्य किशोर नाईक, डिचोली तालुका संयुक्त सचिव प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.









