वर्षा उसगांवकरना प्रदान करणार जीवनगौरव पुरस्कार
पणजी : यंदाच्या राज्य चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आज गुरुवार 14 रोजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 3.30 वाजता होणाऱ्या या सोहळ्यास ईएसजीच्या उपाध्यक्ष डिलायला लोबो यांचीही उपस्थिती लाभणार आहे. प्रसिद्ध चित्रतारका आणि गोमंतकीय सुकन्या वर्षा उसगांवकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यंदाचा हा महोत्सव यापूर्वीच्या 10व्या, 11व्या आणि 12व्या आवृत्तीचे एकत्रित सादरीकरण म्हणून आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन सोहळा कांपाल येथील आयनॉक्स चित्रपटगृहात क्रीन 1 मध्ये होणार असून आयनॉक्ससह मॅक्विनेझ पॅलेस थिएटर येथे चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. यातील फिचर फिल्म विभागात 21 पुरस्कार आणि नॉन फिचर फिल्म विभागात 7 पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्या पुरस्कारांमध्ये 19 फिचर फिल्म आणि 4 नॉन फिचर फिल्ममध्ये स्पर्धा आहे. 48 तासांच्या लघुपट स्पर्धेतील विजेत्यांची घोषणाही उद्घाटन सोहळ्यादरम्यानच करण्यात येणार आहे.
चित्रपट क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्वे नीलाभ कौल, पंकज सक्सेना, ज्येष्ठ अभिनेते कंवरजीत पेंटल, चिताह शेट्टी यांसारख्या प्रज्ञावंतांच्या कार्यशाळा आणि मास्टरक्लासेसचाही यांचाही या महोत्सवात समावेश राहणार आहे. दरम्यान, दि. 17 रोजी चित्रपट महोत्सवाचा समारोप आणि पुरस्कार वितरण होणार असून त्यावेळी वर्षा उसगावकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिद्ध गायिका जॉली मुखर्जी यांचे सादरीकरण हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहे. त्याशिवाय मुकेश घाटवळ यांचे एकल बँड तसेच सागर करांडे आणि अंकुर वाधवे यांचे विनोदी अभिनय सादरीकरण होणार आहे. दि. 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान आयोजित महोत्सवात आयनॉक्सच्या अंगणात फूड कोर्ट आणि हस्तकला स्टॉल्स यांचाही समावेश असणार आहे. या महोत्सवासाठी प्रतिनिधी आणि अन्य नोंदणी यापूर्वीच प्रारंभ झाली असून अधिक माहितीसाठी ‘ईएसजी डॉट को डॉट इन’ या वेबसाईटला भेट द्यावे, असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.









