राज्याच्या दूध उत्पादन क्षेत्रातील शिखर संस्था असलेली ‘गोवा राज्य सहकारी दुग्ध उत्पादन संघ’ म्हणजेच गोवा डेअरीच्या संचालक मंडळासाठी येत्या 18 जून रोजी निवडणूक होत आहे. संचालक मंडळाच्या 12 जागांसाठी 38 उमेदवारांनी अर्ज भरले असून 3 जून रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल.
गोव्याच्या सहकार क्षेत्रातील ही महत्त्वाची संस्था, गेल्या काही वर्षांत दूध उत्पादनापेक्षा अन्य कारणांसाठी अधिक चर्चेत आहे. सततचे गैरव्यवहार व गैरव्यवस्थापनामुळे यापूर्वीचे संचालक मंडळ अल्पमतात आल्याने मागील तीन वर्षे या संस्थेचा कारभार प्रशासक व त्यानंतर त्रिसदस्यीय समितीवर सोपवावा लागला होता. कुठल्याही सहकारी संस्थेवर अशी परिस्थिती ओढविणे म्हणजे विश्वासार्हतेची लक्तरे वेशीवर टांगणे होय. तीन वर्षांनंतर आता नव्याने निवडणुका होत आहेत मात्र उमेदवारांच्या यादीत बहुतेक जुनी धेंडेच दिसतात. उमेदवारी अर्ज छाननीमध्ये एकाही अर्जावर हरकत घेतली नसली तरी ते निर्दोष आहेत, असे मुळीच म्हणता येणार नाही.
दिवसाकाठी दोन लिटर व वर्षाकाठी 270 दिवस दुधाचा पुरवठा करणारा स्थानिक दूध संस्थेचा प्रतिनिधी उमेदवारीस पात्र ठरतो. गोवा डेअरीची स्थापना होऊन 50 वर्षे उलटली तरी कालानुरुप जुने कायदे व नियमांमध्ये बदल न झाल्याने दूध उत्पादक नसलेले लोकच त्यातील त्रुटींचा फायदा घेऊन संचालक मंडळावर पोहोचत असल्याने खऱया शेतकऱयांचा आक्षेप आहे. गोवा राज्यात स्वतंत्र सहकार कायदा असला तरी आजही गुजरातच्या आणंद पॅटर्ननुसार गोवा डेअरीची निवडणूक होते. त्याचा फायदा घेऊन जुन्या लोकांनीच डेअरीवर अनेक वर्षे बस्तान मांडले आहे.
गोवा डेअरीवर राज्यातील पाच हजारांहून अधिक शेतकरी अवलंबून आहेत. 18 हजार एकूण नोंदणीकृत सदस्य असून त्यापैकी साधारण 5200 शेतकरी डेअरीला नियमित दूध पुरवठा करतात. राज्यभरात 173 स्थानिक दूधसंस्था गोवा डेअरीशी संलग्न आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार दरदिवशी गोवा डेअरीत 48 ते 50 हजार लिटर दूध संकलित केले जात असून 50 ते 55 हजार लिटर बाजारातील विक्री आहे. राज्यभरात एकूण 36 पुरवठादार व 280च्या आसपास कर्मचारी गोवा डेअरीत काम करतात. सांगे, डिचोली, सत्तरी, काणकोण, पेडणे व सासष्टी तालुक्यातून सर्वाधिक दूध पुरवठा होत आहे.
एकेकाळी गोवा डेअरी म्हणजे गोव्यातील ग्राहकांचा विश्वास होता पण गेल्या काही वर्षांत या संस्थेतील जे गैरव्यवहार चव्हाटय़ावर आले, त्यामुळे ग्राहकांचा विश्वास उडाला. 1980 नंतर काही संचालक मंडळांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे दूध उत्पादन व विपणनामध्ये डेअरीने बरीच प्रगती केली होती. या काळात 90 ते 92 हजारांपर्यंत विक्री वाढली होती. जी आज जेमतेम 50 हजार लिटरवर आली आहे. संचालक मंडळात काही स्वार्थी व आपमतलबी लोक घुसल्याने डेअरी सहकाराकडून स्वाहाकाराकडे पोहोचली. पशुखाद्यापासून परराज्यातून आयात होणाऱया दुधावर लाटली जाणारी मलई, खरेदी निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहार, निकृष्ट दर्जाचे पशुखाद्य, तोटय़ात आलेला आईस्क्रीम प्रकल्प व पशुखाद्य प्रकल्प, अतिरिक्त नोकर भरती, एनडीडीबीकडून मिळालेल्या कोटय़वधी रुपयांच्या निधीचा गैरवापर अशा अनेक गैरप्रकारांमुळे डेअरी डबघाईस आली. काही माजी अध्यक्ष व अधिकाऱयांनी तर ही संस्था भ्रष्टाचाराचे कुरण बनविली. कुमारी व्हीलीयन फार्म खरेदी गैरव्यवहाराची चौकशी अनेक वर्षे चालली मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. गोवा डेअरीमध्ये आज किमान दहा लोकांवर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे मात्र अद्याप एकाही प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे हे घोटाळे पचवून गब्बर झालेल्यांपैकी काही लोकच पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दिवस-रात्र काबाडकष्ट करून डेअरीला दूध पुरविणारा सामान्य शेतकरी मात्र भरडला जात
आहे.
आजच्या व्यावसायिक स्पर्धेत बाजारात कुठलाही प्रॉडक्ट टिकायचा असल्यास प्रभावी मार्केटिंग अत्यावश्यक आहे. गोवा डेअरीमध्ये ही यंत्रणाच कोलमडलेली दिसते. अमूल व अन्य खासगी डेअरींचे मोठे आव्हान गोवा डेअरीसमोर ठाकले असून सुमूलने गोव्यात पाऊल ठेवल्यापासून दूध संकलन व बाजारपेठेतील विक्रीमध्ये गोवा डेअरीला मोठा फटका बसलेला आहे. एकेकाळी दूध म्हणजे गोवा डेअरी या विश्वासावर जोडलेला ग्राहक आज इतर पर्यायांकडे वळताना दिसतो. गोवा डेअरीची ही स्थिती केवळ गोव्याच्याच बाजारात नसून परराज्यातील कच्चा मालाचे पुरवठादार या संस्थेशी व्यवहार करण्यास धजावत नाहीत.
गोवा डेअरी ही सहकारी तत्त्वावर चालणारी व स्थानिक उत्पादकांचा कणा असलेली संस्था आहे. दूध उत्पादकांचे हित जपतानाच बाजारपेठेतील स्पर्धेत टिकून राहण्याचे मोठे आव्हान आज गोवा डेअरीसमोर आहे. त्यासाठी गावागावात जाऊन स्थानिक दूध संस्था व दूध उत्पादकांचे प्रश्न सोडवितानाच दुसऱया बाजूने बाजारपेठेतील प्रचंड स्पर्धेला तोंड देण्याची तयारी हवी. ग्राहकांना चांगल्या दर्जाचे दूध पुरवितानाच शेतकऱयांना योग्यवेळी व योग्य दरात हिरवा चारा तसेच अन्य खाद्य पुरविण्याची गरज आहे. शेतकऱयांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, कामगारांना सुविधा या सर्वच गोष्टींकडे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या काही वर्षांत गोवा डेअरीवर निवडून आलेल्या संचालक मंडळांनी मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करून तेथील सत्तेच्या राजकारणालाच अधिक महत्त्व दिले.
येत्या पाच वर्षांत गोवा डेअरीत आवश्यक त्या सुधारणा न झाल्यास डेअरीचे भवितव्य धोक्यात आहे. तशीच परिस्थिती निर्माण झाल्यास सरकार एखाद्या दिवशी खासगी डेअरीकडे ही संस्था सोपविण्यास मागेपुढे पाहणार नाही. अंतर्गत राजकारण व कोर्ट कचेऱयांमध्ये अडकलेल्या डेअरीची वाटचाल सध्या त्याच दिशेने सुरू आहे. तसे झाल्यास गोव्यातील दूध उत्पादक आपल्या हक्काचे घर गमावून बसेल. दूध उत्पादनाच्या बाजारपेठेत एक उत्कृष्ट ब्रँण्ड म्हणून टिकून राहायचे की, राजकीय आखाडय़ात आपले हितसंबंध जपत बसायचे, हे नवीन संचालकांना ठरवावे लागेल.
सदानंद सतरकर








