डेअरीच्या शेतकऱ्यांना मतदान हक्क : डेअरीचे सर्व साडेचार हजार शेतकरी आता मतदार,शेतकऱ्यांची दरफरक रक्कम थेट बँकेत होणार जमा,फोंड्यात तीन दिवसीय कृषी महोत्सवास प्रारंभ
फोंडा : गोवा डेअरीत लोकशाही नांदण्यासाठी सर्व साडेचार हजार दूध उत्पादकांना मतदानाचा हक्क देण्यासाठी कायद्यात बदल करून गोवा डेअरीत फेरनिवडणूक घेण्यात येईल. यापुढे शेतकऱ्यांना दरफलकाच्या सवलतीसाठी नऊ महिने वाट बघावी लागणार नसून, फक्त पंधरा दिवसात दूध दरफरक थेट खात्यात जमा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गोवा डेअरीवर प्रशासक नेमणे ही सरकारची इच्छा नसून त्याला कारणीभूत घोटाळेखोर संचालक आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे पालन सरकारने केलेले आहे. यापुढे गोवा डेअरीच्या संचालक मंडळ निवडीसाठी सर्व दूध उत्पादकांना अधिकार मिळावा यासाठी आपले प्रयत्न राहणार आहे. आज कोणीही दहा लिटर दूध उसने घेऊन सोसायटीला पुरवितो, त्या सोसायटीचा अध्यक्ष बनतो आणि पुढे गोवा डेअरीवर संचालक बनून घोटाळे करण्यात त्याला मोकळे रान मिळत असल्याची टीकाही डॉ. सावंत यांनी केली. कुर्टी-फोंडा येथील क्रीडा प्रकल्पाच्या मैदानावर काल शुक्रवारी गोवा कृषी संचालनालयातर्फे पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात आयोजित केलेल्या तीन दिवशीय कृषी महोत्सवात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषीमंत्री रवी नाईक, वीजमंत्री रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर, फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक, कुर्टी खांडेपारच्या सरपंच संजना नाईक, कृषी संचालक नेवील आल्फोन्सो उपस्थित होते.
कोणत्याही परिस्थितीत शेतजमिनी विकू नका
पैशांच्या लोभापोटी राज्यात शेतजमिनीही विकण्याचा सपाटा सुरू आहे. सरकारने सुपिक भातशेती जमीन टिकवून ठेवण्यासाठी नवा कृषी कायदा केलेला आहे. यापुढे शेतकऱ्यांचे हित जपताना शेतीपंपांना अखंडित वीजपुरवठ्यासाठी 100 टक्के सबसिडीसह सोलर पंप योजना राबविण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनो, आपल्या सुपिक जमिनी विकू नका! शेतीला आधुनिकतेची जोड द्या, त्या लागवडीखाली आणून पुढील पिढीसाठी भातशेती जमीन राखून ठेवा, अशी कळकळीची विनंती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी केली.
कुळ-मुंडकारांचे खरे प्रणेते रवी नाईकच
पेडणे ते काणकोणपर्यंतच्या शेतकऱ्यांचे हित जपणे ही आपली प्राथमिकता आहे. शेतकऱ्यांना कुळ-मुंडकार हक्कानुसार ‘कसेल त्याची जमीन’ मिळवून देण्यासाठी माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे अमूल्य योगदान असून तेच खरे कुळ मुंडकारचे प्रणेते असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री सावंत यांनी काढले. तंत्रज्ञानामुळे बरेच शेतकरी पुन्हा शेतीकडे वळले आहेत. ओल्ड गोवा येथील कृषी महाविद्यालयात गोमंतकीय युवकांनी संशोधनात्मक कार्य करावे, अशी आशा व्यक्त केली. ग्रामीण शेतकरी क्लबना शेती उत्पादनाबरोबरच योजनांविषयी जागृती उपक्रम राबविण्यास कृषीमित्र फिल्डवर उतरलेले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या, गाऱ्हाणी कृषीअधिकारी, कृषीमित्र ऐकून न घेतल्यास थेट सीएमओ कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
शेतकऱ्यांनी हमखास भेट द्यावी : आल्फोन्सो
कृषिविषयक तंत्रज्ञान, शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांकडे पोहोचविणे, शेतकरी शास्त्रज्ञ आणि शेतकरी विस्तार, विपणन साखळी सक्षमीकरण, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री माध्यम विकसित करणे या उद्देशाने कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्यावतीने राज्यात पहिल्यांदाच 19 ते 21 मे असे तीन दिवशीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कृषी संचालक नेवील आल्फोन्सो यांनी दिली. कृषीविषयक परिसंवाद, प्रदर्शनात खते, औषधे, बी बियाणे, औजारे, यंत्रसामुग्री, सिंचन साधने, फलोत्पादन, पॅकेजिंग आदींशी निगडीत 125 स्टॉल उभारण्यात आले आहेत. राज्याबाहेरील केरळ, हिमाचल या भागातील अन्न संस्कृतीविषयीही यावेळी परिसंवाद व चर्चासत्रे होणार आहे.
पडिक शेती लागवडीखाली आणावी : नाईक
कृषीमंत्री रवी नाईक म्हणाले की, शेतकऱ्यांनी आपल्या वडिलोपार्जित शेती सांभाळीत उत्तम व्यावसायिक बनावे. शेती व्यवसायात नवनवीन उपक्रम राबवित पडिक शेती लागवडीखाली आणावी. डॉ. सावंत सरकारचा शेतकरी योजनांसाठी मध्यस्थ ठरणाऱ्या दलालांना हटवून कृषी अनुदान थेट लाभार्थीच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
खाजन शेतीसाठी प्रयत्न व्हावेत : ढवळीकर
वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी मांडवी व जुवारी नदीच्या कुशीवर वसलेल्या कुंडई, मडकई, शिरोडा, बोरी, आगापूर व अन्य काही भागांमध्ये खाजन शेतीबाबत चिंता व्यक्त केली ती सुधारण्यासाठी प्रयत्न व्हावे अशी आशा व्यक्त केली. महोत्सवाच्या प्रारंभी अंत्रुज महालातील कुर्टी-फोंडा येथील सरस्वती कल्चरल व कलारंगच्या लोककलाकारांकडून समईनृत्य, घोडेमोडणी व जागरनृत्य सादरीकरण झाले. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलनाने सोहळ्याची सुरूवात करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते शेतकऱ्यांना सवलतीचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी नवीन योजनेचा शुभारंभ कळ दाबून करण्यात आला. या योजनेचा पहिला लाभार्थी पंढरी गोपाळ मळिक यांना मुख्यमंत्र्यांच्याहस्ते धनादेश वितरित करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक कृषी खात्याचे संचालक नेवील आल्फान्सो यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये व गिरीष साळगांवकर यांनी केले. सहाय्यक संचालक अनिल नोरोन्हा यांनी आभार मानले. महोत्सवाला शेतकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला असून पहिल्याच दिवशी सुमारे दीड हजार शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. आज 20 व उद्या 21 मे असे दोन दिवस हे कृषी प्रदर्शन चालणार आहे.









