प्रतिनिधी / बेळगाव
भरधाव कारची दुभाजकाला धडक बसून महामार्गाच्या दुसऱया बाजूला कार उलटली. गुरुवारी सकाळी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील काकतीजवळ ही घटना घडली असून या अपघातात गोव्याचे वृद्ध दाम्पत्य सुखरुप बचावले आहे.
कृष्णा खाचू बाबले (वय 69), त्यांची पत्नी शोभा (वय 62, दोघेही रा. देसाईनगर, साखळी, डिचोली-गोवा) हे वृद्ध दांपत्य जीए 04 सी 6928 क्रमांकाच्या स्वीप्ट कारमधून कवळीकट्टीहून गोव्याला जात होते. त्यावेळी हा अपघात घडला आहे.
कृष्णा हे कार चालवत होते. काकती येथील वैष्णवी धाब्याजवळ दुभाजकाला ठोकरून बेळगावहून कोल्हापूरकडे जाणाऱया मार्गावर कार उलटली. या अपघातात वृद्ध दाम्पत्य सुखरुप बचावले आहे. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद व सहकाऱयांनी घटनास्थळी पंचनामा केला.









