सक्रिय रुग्णसंख्या शून्य
प्रतिनिधी/ पणजी
गोवा राज्य आता कोरानामुक्त झाले असून जनतेसह डॉक्टर्स व आरोग्य खात्याचे कर्मचारी अशा सर्वच लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकेकाळी गोव्यासह देशभरात कोरोनाने थैमान घातले होते. परंतु राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता शून्यावर आली आहे. गेल्या 24 तासात एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे गोवा राज्य सध्या तरी कोरोनातून मुक्त झाले आहे.
आरोग्य खात्याच्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 204 जणांचे नमुने तपासण्यात आले. परंतु एकही सक्रिय रुग्ण सापडला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून गोव्यात कोरोनाचे किरकोळ रुग्ण सापडत होते. त्याचा आलेख उतरताच होता. त्यामुळे गोवा कोरोनामुक्त होणार अशी चिन्हे स्पष्टपणे दिसत होती.
मागील जुलै महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची फारशी नोंद झाली नव्हती. शेवटी दोन नवीन रुग्ण सापडले होते. 1 ऑगस्ट रोजी एका रुग्णाची नोंद झाली. नंतर 9 ऑगस्ट रोजी 1 नवीन रुग्ण मिळाला. अधूनमधून एकादा रुग्ण सापडत होता. शेवटी शिल्लक राहिलेल्या एका सक्रिय रुग्णास काल बुधवारी घरी पाठवण्यात आले. त्यानंतर सक्रिय रुग्णांचा तक्ता शून्यावर आला आणि रिकामा झाला आहे. गोव्यात आजपर्यंत 2,63,334 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली तर 4014 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.









