खानापुरात भाजप उमेदवाराच्या प्रचार कार्याचा घेतला आढावा
खानापूर : खानापूर तालुक्याचे आणि गोव्याचे फार जुने ऋणानुबंध आहेत. येथील जनता आणि गोवा एकमेकांवर गेल्या अनेक वर्षापासून विविध पातळीवर अवलंबून आहेत. आणि याच्यातूनच सर्व क्षेत्रातील विकासाचा धागा गुंफला गेला आहे. खानापूर तालुक्यातील लोकांनी गोव्याच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे. ते योगदान आम्ही कदापी विसरु शकत नाही. याच ऋणानुबंधाची जाण ठेवून खानापूर मतदार संघातील मतदारांना भाजपला मतदान करून विकासाचे साथीदार होण्याचे मी आवाहन करत आहे, असे गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. खानापूर मतदारसंघाच्या भाजपच्या निवडणुकीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खानापूरला भेट दिली होती. यावेळी भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले. निवडणुकीच्या वेळी वेगवेगळ्या पातळ्यांवर काय नियोजन करायचे, मतदानाबाबत कोणताही गाफीलपणा न ठेवता जागरूकतेने कार्यकर्त्यांनी मतदान पार पडेपर्यंत जागृत रहावे, असे त्यांनी आवाहन केले. गोव्यात भाजपचे सरकार आहे. कर्नाटकात भाजपचे सरकार यावे, केंद्रातही भाजपचे सरकार आहे. यामुळे या भागाच्या विकासासाठी ट्रिपल इंजिनची जोड मिळेल. यामुळे विकासाला चालना मिळेल. खानापूर तालुका भाजपच्यावतीने विठ्ठल हलगेकर यांनी गणेशमूर्तीची भेट देवून प्रमोद सावंत यांचे स्वागत केले. य् ाावेळी तालुका अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी आमदार अरविंद पाटील, गुंडू तोपिनकट्टी, अप्पय्या कोडोळी, बसवराज सानिकोप, जि. पं. माजी सदस्य बाबुराव देसाई, सुरेश देसाई यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









