क्रीडा वृत्तसंस्था/ अहमदाबाद
जेतेपदाच्या हॅटट्रिकच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या गोवा चॅलेजर्सने शनिवारी येथे झालेल्या अल्टीमेट टेबल टेनिस सीझन 6 च्या दुसऱ्या सामन्यात यजमान अहमदाबाद एसजी पायपर्सचा 10-5 असा पराभव करून जेतेपदाच्या बचावाची सुरुवात शानदार पद्धतीने केली. दुसऱ्या लढतीत दबंग दिल्लीनेही यजपूर पॅट्रियट्सवर विजय मिळविला.
पोर्तुगालच्या टियागो अपोलोनियाने गोवा चॅलेंजर्सच्या मोहिमेला सुरुवात करताना पुरुषांच्या पहिल्या एकेरीच्या सामन्यात स्नेहित सुरवज्जुलाचा 2-1 (11-6 11-6 10-11) असा पराभव केला. त्यानंतर महिला एकेरीत कृत्विका सिन्हा रॉयने ऐहका मुखर्जीचा 2-1 (4-11 11-8 11-9) असा पराभव करून गोवा चॅलेंजर्सची आघाडी वाढवली. परंतु हरमीत देसाई आणि झेंग जियान या जोडीला रिकार्डो वॉल्थर आणि मुखर्जी यांच्याकडून 1-2 (9-11 10-11 11-10) असा मिश्र दुहेरीत गोवा चॅलेंजर्सला पराभव पत्करावा लागला. तथापि, देसाईने पुरुषांच्या एकेरीच्या सामन्यात वॉल्थरवर 2-1 (6-11 11-10 11-13) असा विजय मिळवून त्याचा बदला घेतला. या लढतीच्या अंतिम सामन्यात, जियानने महिला एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात इटलीच्या जॉर्जिया पिकोलिनचा 3-0 (11-7, 11-7, 11-5) असा पराभव केला.
दबंग दिल्ली विजयी
त्याआधी, भारतीय पॅडलर साथियान जी. आणि दिया चितळे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत माजी चॅम्पियन दबंग दिल्ली टीटीसीला यूटीटी सीझन 6 च्या सलामीच्या सामन्यात जयपूर पॉट्रियट्सवर 11-4 असा विजय मिळविला.. सिंगापूरच्या क्वेक इझाकने एका गेमने पिछाडीवर पडल्यानंतरही पुनरागमन करत पहिल्या पुरुष एकेरीच्या सामन्यात अमेरिकन कनक झाचा 2-1 (5-11 11-5 11-9) पराभव केला आणि 2018 चा चॅम्पियन दबंग दिल्लीला आघाडी मिळवून दिली. महिला एकेरीत स्पेनच्या मारिया जिओवर 2-1 (4-11 11-9 11-10) असा विजय मिळवून भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीजा अकुलाने जयपूर पेट्रियट्सला परत आणले. सलग सहाव्या हंगामात दबंग दिल्लीकडून खेळण्राया ऑलिंपियन साथियानने नंतर दबंग दिल्लीसाठी जिओसोबत हातमिळवणी केली आणि मिश्र दुहेरी सामन्यात झा आणि अकुला या जोडीचा 3-0 (11-6 11-10 11-6) असा पराभव केला. त्यावेळी ज्ञानशेखरनने जबरदस्त खेळ केला आणि पुरुषांच्या रिव्हर्स एकेरीत जीत चंद्रावर 3-0 (11-6, 11-7, 11-6) असा सहज विजय मिळवला.
या वर्षीच्या लिलावात सर्वाधिक मूल्य असलेली भारतीय खेळाडू चितळे देखील चांगल्या लयीत दिसत होती आणि तिच्या फोरहँड आणि बॅकहँड शॉट्समध्ये ती वेगवान होती. तिने उत्कृष्ट स्पिन सर्व्हिसेस आणि शक्तिशाली फोरहँड स्मॅशचा वापर करून वरचे मानांकन असलेल्या नेदरलँड्सच्या 43 व्या क्रमांकाच्या ब्रिट एरलँडवर विजय मिळवला आणि दबंग दिल्लीला सहज विजय आणि आत्मविश्वासपूर्ण सुरुवात मिळवून दिली. यूटीटीच्या लीग टप्प्यात, जेव्हा खेळाडूने पहिले 11 गुण मिळवले तेव्हा एक गेम जिंकला जातो, ज्यामध्ये 10-10 अशा बरोबरीच्या निर्णायक गेमचा वापर केला जातो. एक संघ सर्वाधिक गेम जिंकून लढत जिंकतो.









