निजामुद्दीन एक्स्प्रेस मंगळवारी रात्री उशिरा बेळगावात दाखल
बेळगाव : तब्बल चार दिवसांनंतर वास्को-बेळगाव रेल्वेमार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली. मंगळवारी वास्को-निजामुद्दीन एक्स्प्रेस रात्री उशिराने बेळगाव रेल्वेस्थानकात दाखल झाली. यामुळे बेळगावहून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रवास करता आला. नैर्त्रुत्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस प्रयत्न केल्यानंतर रेल्वेमार्ग सुरळीत करण्यात आल्याने मंगळवारपासून प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आली आहे. दूधसागर ते सोनाळी या रेल्वेस्थानकांदरम्यान ब्रागंझा घाटमाथ्यावर शुक्रवारी सकाळी कोळशाची वाहतूक करणारी मालवाहू रेल्वे रुळावरून घसरली. एकूण 58 डब्यांपैकी 17 डबे रुळावरून घसरले. यामध्ये रुळाचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे बेळगाव-गोवा रेल्वेमार्ग पूर्णपणे ठप्प होता. नैर्त्रुत्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस प्रयत्न करून रेल्वेमार्ग सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सायंकाळी 7.30 वाजता मालवाहू रेल्वे या मार्गावरून सोडण्यात आली. ताशी 10 कि.मी. वेगाने दुर्घटनाग्रस्त झालेल्या भागातून रेल्वे धावल्याने चाचणी यशस्वी झाली. त्यामुळे मंगळवारपासून प्रवासी वाहतूक सुरू होण्याची शक्यता होती. त्यानुसार दुपारी नियमित वेळेनुसार वास्को येथून निघालेली निजामुद्दीन एक्स्प्रेस रात्री 8.30 च्या सुमारास बेळगावमध्ये पोहोचली. तसेच गोवा एक्स्प्रेसही मंगळवारी मध्यरात्री लोंढा-दूधसागर मार्गे धावली. यामुळे मागील चार दिवसांपासून बंद असलेली बेळगाव-गोवा रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे.
मालवाहू रेल्वे यशस्वीरित्या धावल्यानंतर वाहतूक सुरळीत
सोमवारी मालवाहू रेल्वे यशस्वीरित्या धावल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली. मंगळवारी वास्को-बेळगाव मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरू झाली. वास्को-निजामुद्दीन एक्स्प्रेस नियमित वेळेनुसार धावल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे.
-मंजुनाथ कनमाडी (जनसंपर्क अधिकारी)









