क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बीच फुटबॉल स्पर्धेत यजमान गोव्याने काल दमदार सलामी देताना ओडिशाचा 12-3 गोलानी दारूण पराभव केला. कालपासून कोलवा समुद्रकिनाऱ्यावर या स्पर्धेला सुरूवात झाली. स्पर्धेत काल केरळ, पंजाब व लक्षद्वीप संघानेही विजय नोंदविले.
अर्जुन पुरस्कार विजेते ब्रुनो कुतिन्होंच्या प्रशिक्षणाखालील गोव्याने या सामन्यात निर्विवाद वर्चस्व ठेवले. गोव्यासाठी पेद्रू गोन्साल्वीस व काशिनाथ राठोडने प्रत्येकी चार तर सतीश, निहाल, रिचर्ड व जोशुवा डिसोझाने प्रत्येकी एक गोल केला. आज रविवारी गोव्याची लढत पंजाबशी सकाळी 10 वाजता होईल.
अन्य एका लढतीत पंजाबने उत्तराखंडला 12-7 तर सकाळच्या सत्रात झालेल्या लढतीत केरळने झारखंडचा 16-1 तर लक्षद्विपने दिल्लीचा 9-3 गोलांनी पराभव केला. आज रविवारी सकाळी 8 वाजता उत्तराखंड वि. ओडिशा, दुपारी 2 वाजता झारखंड वि. दिल्ली तर 4 वाजता लक्षद्विप वि. केरळ यांच्यात लढती होतील.









