आर्थिक सहाय्य देऊन केला सन्मान
बेळगाव : चीन येथील चेंगडू येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विश्व विद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतीय 4×400 मी. रिलेच्या संघात निवड झालेल्या श्रीनाथ दळवी याचा बेळगावमधील अग्रस्थानी असलेली क्रीडा संस्था साईराज स्पोर्ट्स क्लबतर्फे खास गौरव करुन 25 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले. राष्ट्रीय विद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेत बेळगावच्या श्रीनाथ दळवीने 4×400 मी. रिले स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करुन निवड समितीचे लक्ष वेधून घेतले होते. निवड समितीने चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विश्व विद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेत 4×400 मी. रिलेच्या भारतीय संघात श्रीनाथ दळवीची निवड केली. श्रीनाथ दळवी याच्या घरची परिस्थिती हालाखीची असून आई-वडील दोघेही शेती करुन कुटुंबाचा उदरर्निवाह करत आहेत. मंडोळी हायस्कूल येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेत त्याने शाळेत तिहेरी उडीत राज्यस्तरीय स्पर्धेत चमक दाखविली होती. त्याचप्रमाणे म्हैसूर येथे झालेल्या दसरा क्रीडा स्पर्धेत 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत व 4×400 मी. रिले स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले होते. त्याचप्रमाणे बेंगळूर येथे झालेल्या कर्नाटक राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत 400 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकाविले होते. त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले होते. त्याची खेळाबद्दलची धडपड पाहून व विश्व विद्यालय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल बेळगावमधील दानशूर क्रीडा संस्था साईराज क्रीडा स्पोर्ट्स क्लबतर्फे खास सत्कार आयोजित करण्यात आला होता. स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष महेश फगरे, आनंद चव्हाण, संभाजी देसाई आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीनाथचा शाल, श्रीफळ देऊन रोख 25 हजार रुपयांची मदत देऊन गौरव करण्यात आला. श्रीनाथला अॅथलेटिक्स प्रशिक्षक ए. बी. शिंत्रे, उमेश बेळगुंदकर, सुरज पाटील व क्रीडा निर्देशक डॉ. रामराव यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे.









