प्राजक्ताचे झाड दिसले की सर्वांची मने आठवणीने ओसंडून जातात. जुन्या वाड्याच्या दारात उभ्या असलेल्या आणि ओथंबून फुले गाळणाऱ्या प्राजक्ताने अनेकांचे बालपण व्यापून टाकले आहे.मंद मंद सुगंधाने लक्ष वेधून घेणारा प्राजक्त हा देववृक्ष आहे. त्याच्यामागे इतिहास आहे. रिमझिम पाऊस, क्षणात ऊन, गंधवती पृथ्वी आणि श्रावणमास….. त्यात प्राजक्ताची लक्ष फुले देवाला वाहण्याचा पूर्वी बायका नवस करीत. लहान मुलं त्यांच्या मागे मागे फिरत. परकराच्या ओच्यात झाडावरून ओघळणारी फुले गोळा करणाऱ्या मुली सर्वांच्याच लक्षात आहेत. देवासाठी गोळा करणाऱ्या फुलांसाठी नियम होते. न चुरगळलेली, न कोमेजलेली, ताजा-ओला गंध असणारी टपोरी फुले मोजून गोळा करून ठेवायची. ती वेचताना कृष्णाचे नामस्मरण करायचे. ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी । हे नाथ नारायण वासुदेव?’ असा गजर चालायचा. निसर्गाच्या जवळ जाण्याचा हा संस्कार लहानपणीच मनावर पूर्वजांनी रुजवला. मंद मंद सुगंधाने लक्ष वेधून घेणारा प्राजक्त हा देववृक्ष आहे. त्याच्यामागे इतिहास आहे.
समुद्रमंथनातून पारिजात हा वृक्ष निघाला आणि देवलोकी विराजमान झाला. स्वर्गलोकांमधला हा वृक्ष श्रीकृष्णाने आपल्या सत्यभामा या राणीच्या हट्टासाठी भूलोकी द्वारकेत आणला. त्यामागील कथा अशी आहे की, नरकासुराचा वध केल्यानंतर श्रीकृष्ण आपले वाहन असलेल्या गरुडावर बसून सत्यभामा या पत्नीसह आकाशमार्गाने स्वर्गलोकाकडे निघाले. स्वर्गाच्या प्रवेशद्वारावर कृष्णाने पांचजन्य शंख फुंकला. श्रीकृष्णाच्या आगमनाची वर्दी मिळताच सर्व देव सत्कारासाठी पुढे आले. त्यांनी श्रीकृष्णाची पूजा केली. इंद्राने त्याची पत्नी सची हिच्यासह श्रीकृष्णाचे साग्रसंगीत पूजन केले. कामे आटपून जेव्हा स्वर्गलोकातून श्रीकृष्ण परत निघाले तेव्हा त्यांना इंद्राने निगुतीने जोपासलेले फळाफुलांनी बहरलेले नंदनवन दृष्टीस पडले. सत्यभामेला त्या नंदनवनातून फेरफटका मारण्याची इच्छा झाली. म्हणून त्या सुंदर उद्यानात त्या दोघांनी प्रवेश केला. सत्यभामेचे लक्ष पारिजातक या वृक्षाकडे गेले आणि त्या वृक्षाने तिचे चित्त हरण केले. मंद परिमळाने तिला मोहित केले. तिने कृष्णाजवळ हट्ट धरला की हा वृक्ष आपण आपल्या घरी घेऊन जाऊ. श्रीकृष्ण म्हणाले, हे रमणी हा वृक्ष इथून नेणे हे धर्माचरण नव्हे. आपल्याविरुद्ध देवता युद्ध पुकारतील. सत्यभामा म्हणाली, माझ्यावर जर तुमचे खरेच प्रेम असेल तर हा वृक्ष तुम्ही भूतलावर घेऊन चला. स्त्राr हट्ट प्रबळ ठरला अन् श्रीकृष्णाने तो वृक्ष उपटला. वृक्ष उपटताच युद्ध सुरू झाले. सत्यभामादेखील चंडिकेचा अवतार धारण करून युद्धात उतरली. सगळे देव आणि इंद्राचा सुद्धा पराभव झाल्यावर इंद्र शरण आला तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तुझी काहीही चूक नाही. अपराध नाही. तुझ्या अंतर्यामी मीच आहे. पृथ्वीवरील माझ्या अवतारसमाप्तीनंतर हा पारिजातक वृक्ष पुन्हा तुझ्या नंदनवनास प्राप्त होईल.
श्रीकृष्ण सत्यभामेसह द्वारकेत आले आणि सत्यभामेच्या अंगणात त्यांनी पारिजात हा वृक्ष लावला. जे पाच स्वर्गीय वृक्ष आहेत त्यात पारिजातकाची गणना होते. उपासक सत्पुरुष श्री सुनील काळे असे म्हणतात की पारिजातक वृक्षाची खास महती आहे. या वृक्षाची पाने इतर झाडांप्रमाणेच सूर्याकडून प्रकाश तर शोषून घेतात; त्याशिवाय सूर्याला प्रकाश देणाऱ्या तेज या महाभूताकडून थेट प्रकाशही शोषून घेतात. तेज हे महाभूत संतृप्त रूपात पारिजातकामध्ये आहे. तेजाचं बीज आहे आणि त्यात शक्ती आहे प्रकाशाची. पारिजातक या वृक्षाच्या माध्यमातून स्वर्गातला जातवेद अग्नी हा पृथ्वीवर आला आहे. पारिजातक वृक्षाला नमस्कार म्हणजे साक्षात तेजाची उपासना. या वृक्षाला प्रार्थना करायची, ‘हे पारिजातकवृक्षा, सर्व समस्यांचा अंधार तू नष्ट कर. मला आणि माझ्या कुटुंबाला प्रकाशमान कर.’ पारिजाता नावाची देवता उत्तर प्रदेशातील कितूर या गावी आहे. हे गाव महाभारतातील कुंतीने वसवलेले आहे. इथे तिचे मंदिर आहे.
या मंदिरापासून एका मैलावर पारिजातकाचा वृक्ष आहे. त्यामागील कथा अशी आहे, ‘कुंतीला सूर्य रोज पूजेसाठी स्वर्गातून पारिजातकाचे फूल आणून देत असे. एके दिवशी ढग दाटून आल्यामुळे सूर्याने फूल आणून दिले नाही, त्यामुळे कुंतीला चिंता वाटली. कुंतीला चिंताग्रस्त बघून अर्जुनाने आपल्या आईला स्वर्गातून साक्षात पारिजातक वृक्षच आणून दिला. तो वृक्ष तिने या जागी लावला आणि त्या दिवसापासून तिला पारिजाता हे नाव पडले’. कितुर या गावातील पारिजातकाचा वृक्ष म्हणजे समाजाचे कुलदैवत आहे. नवीन लग्न झालेले दांपत्य प्रथम या वृक्षाच्या दर्शनासाठी येते. लहान मुलांचे जावळे काढण्याचा संस्कारही इथे करतात. दर मंगळवारी येथे जत्रा भरते.
पारिजातकाच्या कोमल फुलामागे विज्ञानही आहे. मानवाच्या निरामय आरोग्यासाठी कलर थेरपी हा उपचार रूढ होतो आहे. रंगांचा परिणाम रोगांवर उपचारासाठी करण्यात येतो. शेंदरी रंगाचा परिणाम मेंदू, मज्जातंतू, बुद्धिमांद्य यावरील आजारात अत्यंत शीघ्रतेने होतो. हा रंग हे आजार बरे करतो म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये भगव्या रंगाची वस्त्रs वापरण्यावर भर आहे.
पारिजातकाच्या शेंदरी रंगाच्या फुलांचा स्पर्श फुले वेचताना बोटांना होतो आणि त्याचा उत्तम परिणाम हा आरोग्यावर होतो. तिन्ही सांजेला उमलून रात्रभर दरवळणारा आणि पहाटे ओंजळीत अमर्याद फुले देणारा हा पारिजात वृक्ष त्याचा संस्कार मनामनांवर जादुई फुंकर घालणारा आहे हे निश्चित. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘तैसे पहिले सरते । श्लोक न म्हणावे गीते । जुनी नवी पारिजाते । आहाती काई?’ गीतेच्या श्लोकात हे पहिले म्हणजे उत्तम, हे शेवटले म्हणजे कमी योग्य असे त्याचे प्रकार आहेत असे म्हणू नये. पारिजातकाच्या जुन्यानव्या झाडांच्या फुलांत जुनी-नवी हे भेद असतात काय?
पारिजातकाची भूल कवींना पडली नाही तरच नवल! कवयित्री संजीवनी मराठे यांना वाटते,
‘असा कसा पारिजात, उभा राहे वाटेवरी
पहाटेच्या शुभ वेळी, ढाळी आसवांच्या सरी..’
या प्रश्नाचे उत्तरच कवी बोरकरांनी जणू काही दिले आहे! ते म्हणतात,
‘दात्यांचे घेत हात, हातांनी हाही रिता
सासुर्यास निघणाऱ्या कन्येचा सजल पिता..!’
पारिजातक हा वृक्ष, त्याची पाने, नाजूक फुले ही भारतीय मनांवर अधिराज्य गाजवतात. आजघडीला अंगण हरवले असले तरी पारिजातकाचा महिमा अजून आहे तसाच आहे, हेही नसे थोडके!
-स्नेहा शिनखेडे








