वैभवशाली शिवजयंती चित्ररथ मिरवणूक, ढोलताशा पथके, ध्वजपथके, मर्दानी खेळांचे होणार दर्शन
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावची ऐतिहासिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शनिवार दि. 27 रोजी निघणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील सजीव देखावे पाहण्याची संधी शिवभक्तांना मिळणार आहे. ढोलताशांचा गजर, ध्वजधारी युवती, शिवकालीन युद्धकला, लेझीम पथक, झांजपथक यांचा सहभाग आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. चित्ररथ मिरवणूक अवघ्या काही तासांवर आल्याने शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे. बेळगावमध्ये पारंपरिक पद्धतीने अक्षय्यतृतीयेदिवशी शिवजयंती साजरी केली जाते. अक्षय्यतृतीयेच्या तिसऱ्या दिवशी भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाते. परंतु, यावर्षी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे ही मिरवणूक दि. 27 मे रोजी आयोजिण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार शनिवारी शहरातून भव्य अशी चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. सायंकाळी 6 वाजता नरगुंदकर भावे चौकात शिवरायांच्या पालखीचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर मुख्य मिरवणुकीला सुरुवात होईल.
यावर्षीच्या चित्ररथ मिरवणुकीमध्ये 65 ते 70 चित्ररथ सहभागी होण्याची शक्यता आहे. मागील महिनाभरापासून मंडळांचे कार्यकर्ते सजीव देखावे सादर करण्यासाठी मेहनत घेत आहेत. शिवचरित्रातील प्रसंगांची निवड, पात्रांची निवड, वाहनांची व्यवस्था, पोशाख यांची जमवाजमव केली जात आहे. शिवकालीन देखाव्यांसोबतच सामाजिक प्रश्नांवर बोट ठेवणारे प्रसंगही या मिरवणुकीत सादर केले जातात. मर्दानी खेळांनी तर डोळ्यांचे पारणे फेडले जाते. त्यामुळे हजारोंच्या उपस्थितीत यावर्षीही मिरवणूक होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मिरवणूक शांततेत व्हावी यासाठी महापालिका, पोलीस प्रशासन, हेस्कॉम यासह इतर विभाग मागील काही दिवसांपासून मेहनत घेत आहेत. लोकप्रतिनिधी व अधिकारीवर्गाने मिरवणूक मार्गाची पाहणी केली आहे. हेस्कॉमकडून धोकादायक विद्युतवाहिन्या हटविण्यात आल्या असून महापालिकेकडून हॅलोजन दिवे बसविण्यात आले आहेत. मिरवणुकीला शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी व चित्ररथ मिरवणूक महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी केले आहे.
असा असणार मिरवणुकीचा मार्ग
नरगुंदकर भावे चौक येथून शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात होईल. त्यानंतर मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदे खूट, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोडमार्गे रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, हेमू कलानी चौक, शनिमंदिर, छत्रपती शिवाजी उ•ाणपूलमार्गे कपिलेश्वर मंदिराजवळ मिरवणुकीची सांगता होईल.
बॅ. नाथ पै चौक शहापूर येथून मिरवणुकीला सुरुवात
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ शहापूरच्यावतीने शनिवार दि. 27 रोजी सायंकाळी 6 वाजता बॅ. नाथ पै चौक शहापूर येथून शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत पहिल्या चित्ररथाचे पूजन करून मिरवणुकीचे उद्घाटन होईल. शहापूर नाथ पै चौक येथून सुरू झालेली मिरवणूक खडेबाजार, छत्रपती शिवाजी उद्यानमार्गे श्यामाप्रसाद मुखर्जी रोड, कपिलेश्वर उ•ाणपूल, शनिमंदिर, स्टेशन रोड, सेंट मेरीजजवळून उभा मारुती व तेथून धर्मवीर संभाजी चौकातील मुख्य मिरवणुकीत सहभागी होईल. यावेळी सर्व महामंडळांच्या पदाधिकाऱ्यांना, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष नेताजी जाधव व सेक्रेटरी श्रीकांत कदम यांनी केले आहे.









