300 छात्रांसह 17 जणींना पदवी प्रदान : मुलींचे पुढचे पाऊल हा मैलाचा दगड असल्याचे कौतुकोद्गार
पुणे : भारतीय सैन्य दलाच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून (एनडीए) पदवी प्राप्त करत 17 महिला छात्रांनी नवा टप्पा पार केला. 300 पुऊष छात्रांसमवेत महिला छात्रांनाही पदवी प्रदान करण्यात आली. विशेष म्हणजे 17 महिला छात्रांपैकी पॅप्टन श्रिती दक्ष हिने कला शाखेत प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. ‘एनडीए’तून मुलींची पहिली तुकडी उत्तीर्ण होणे हा देशातील हजारो मुलींसाठी मैलाचा दगड असून, उत्कृष्टता आणि सेवेचा ध्यास कोणत्याही लिंगापुरता सीमित नसतो,’ असे कौतुकोद्गार दीनदयाळ उपाध्याय गोखपूर विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. पूनम टंडन यांनी काढले. भूदल, नौदल आणि हवाई दलांचे प्रशिक्षण देणाऱ्या एनडीएतील 148 व्या तुकडीच्या पदवी प्रदान समारंभात प्रा. टंडन बोलत होत्या. त्यांच्या हस्ते छात्रांना पदवी प्रदान करण्यात आली.
एनडीएचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल गुरचरण सिंग, प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात एकूण 339 छात्रांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. त्यात 84 छात्रांना विज्ञान शाखेची पदवी (बीएस्सी), 85 छात्रांना संगणकशास्त्र पदवी, 59 छात्रांना कला शाखेची पदवी, तर 111 छात्रांना बी.टेक. पदवी देण्यात आली. याच कार्यक्रमात विविध शाखांमध्ये अग्रस्थान पटकावलेल्या छात्रांना गौरविण्यात आले. त्यात विज्ञान शाखेत लकी कुमार याने, पॅप्टन प्रिन्स कुमार याने संगणकशास्त्र शाखेत, पॅप्टन श्रिती दक्ष हिने कला शाखेत प्रथम क्रमांक पटकावला. पॅप्टन उदयवीर सिंग नेगी याने बी.टेक. शाखेतून पहिला क्रमांक मिळवला. पदवी प्रदान आणि महिलांची पहिली तुकडी उत्तीर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रा. टंडन म्हणाल्या, एनडीएने आजपर्यंत 40 हजारांहून अधिक अधिकारी घडविले आहेत. या अधिकाऱ्यांनी युद्ध आणि शांततेच्या काळात देशासाठी मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी तेजस्वी वाटचाल करत न्याय आणि सेवेच्या सर्वोच्च परंपरा जपल्या आहेत.
हा महत्त्वाचा टप्पा : प्रा. पूनम टंडन
आता एनडीएतून महिलांची पहिली तुकडी उत्तीर्ण होत आहे. तुम्ही मुलींनी केलेली कामगिरी भारतभरातील हजारो मुलींसाठी महत्त्वाचा टप्पा आहे. तुम्ही परिवर्तन, धैर्य आणि निर्धाराचे उदाहरण आहात. सर्वोत्कृष्टता आणि सेवेचा ध्यास तुम्ही सिद्ध केला आहे.तुमची जिद्द, सौंदर्य आणि निर्धाराला सलाम आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
नेतृत्व लिंगाने नव्हे, चारित्र्याने ठरते
नेतृत्त्व हे पद, अधिकार, लिंगाने नव्हे, तर ते चारित्र्याने ठरते. वैयक्तिक आचरणातून इतरांना दिशा देतो, स्वत:च्या हितापेक्षा इतरांच्या कल्याणाला अधिक महत्त्व देतो तो खरा नेता असतो. पदवीधर होत असलेली महिला छात्रांची तुकडी, त्यांचे पुऊष सहकारी त्यांचे आदर्श नेतृत्त्व सिद्ध करतील याची मला खात्री आहे. तसेच तुमच्या शौर्याने, उदात्त कार्याने आणि यशाने तुम्ही एनडीएचे, तुमच्या सेवांचे, देशाचे नाव मोठे करणे ही एनडीए, शिक्षक, प्रशिक्षक, मार्गदर्शकांना खरी गुऊदक्षिणा ठरेल.
– व्हाईस अॅडमिरल गुरचरण सिंग, प्रमुख, एनडीए
माझ्या यशातून मुलींना प्रेरणा मिळेल…
‘आम्ही मूळचे हरियाणाचे असून नोएडा येथे वास्तव्याला आहे. माझे शालेय शिक्षण नोएडा येथील शाळेत झाले. दहावीत 97 टक्के, तर बारावीत 99 टक्के गुण मिळाले होते. ‘एनडीए’मधील प्रशिक्षण अतिशय खडतर होते. इथल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास थोडा वेळ गेला. मात्र त्यानंतर येथील शिक्षक, वरिष्ठ छात्रांमुळे सर्वच एकऊप झालो. माझे वडील योगेशकुमार दक्ष सेवानिवृत्त विंग कमांडर आहेत. ते ‘एनडीए’च्या 86 व्या तुकडीचे स्नातक आहेत. माझी आई शिक्षिका आहे, तर मोठी बहीण हवाई दलात फ्लाईंग ऑफिसर आहे. मी आता इंडियन मिलिट्री अकादमी (आयएमए) येथे पुढील प्रशिक्षणासाठी दाखल होणार आहे. माझे हे यश माझ्यासारख्या सशस्त्र सैन्य दलात येऊ पाहणाऱ्या मुलींना निश्चित प्रेरणा देईल, असा विश्वास आहे’, अशा भावना श्रिती दक्ष हिन व्यक्त केल्या.
-कला शाखेत प्रथम आलेल्या श्रिती दक्षच्या भावना








