जगभरातील 1500 प्रतिनिधी घेणार सहभाग
पणजी : हिंदू राष्ट्र स्थापनेच्या आंदोलनाला गती देण्याच्या उद्देशाने आयोजित ’वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव’ उद्या दि. 16 जूनपासून प्रारंभ होत असून रामनाथी फोंडा येथील श्रीरामनाथ देवस्थान परिसरात पाच दिवस हा महोत्सव चालणार आहे. पणजीत बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी ही माहिती दिली. पत्रकार परिषदेस जनजागृती समितीचे नीलेश सिंगबाळ, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस, हिंदू विधीज्ञ परिषदेचे राज्य सचिव नागेश जोशी यांचीही उपस्थिती होती.
देशविदेशांतून येणार प्रतिनिधी
अधिवेशनाचे यंदाचे 11 वे वर्ष असून त्यात अमेरिका, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी, सिंगापूर, इंडोनेशिया, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ या देशांसह भारतातील 28 राज्यांमधून 350 हून अधिक हिंदू संघटनांचे 1500 पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभाग घेणार आहेत.
‘गोवा फाईल्स’संदर्भात होणार चर्चा
या महोत्सवात प्रामुख्याने ’दी काश्मीर फाईल्स’, ’दी केरला स्टोरी’, यांच्या धर्तीवर ’गोवा फाईल्स’ संदर्भात चर्चा होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. यापूर्वी झालेल्या अधिवेशनामुळे हिंदू राष्ट्राची चर्चा वैश्विक पातळीवर होण्यास प्रारंभ झाला आहे. त्यातून हिंदू राष्ट्राची मागणी करणारी अनेक व्यासपीठे निर्माण झाली आहेत. तरीही बंदी घातलेल्या पीएफआय यासारख्या संघटना 2047 पर्यंत भारताला ’इस्लामी राष्ट्र’ बनविण्याची षडयंत्रे रचत आहेत. अशावेळी भारताचे तुकडे होऊ द्यायचे नसतील तर भारताला आदर्श रामराज्य अर्थात हिंदू राष्ट्र बनविण्याशिवाय पर्याय नाही, असे शिंदे पुढे म्हणाले. चेतन राजहंस यांनी बोलताना, गतवर्षी गोव्यात झालेले अधिवेशन व 4 फेब्रुवारी 23 रोजी जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय मंदिर परिषदेतून मांडण्यात आलेल्या मंदिर महासंघ संकल्पनेमुळे महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये वस्रसंहिता राबविण्याचा उपक्रम चालू आहे. त्याद्वारे आतापर्यंत 131 पेक्षा जास्त मंदिरांनी सात्विक वस्रसंहिता लागू केली आहे. देशभरात त्याचे अनुकरण चालू झाले आहे, असे सांगितले. श्री. सिंगबाळ, श्री. जोशी यांनीही अधिवेशनासंबंधी अधिक माहिती दिली.









