दिवसभर शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने गोविंदला प्रोत्साहन दिले
कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा बारावी सायन्सचा विद्यार्थी गोविंद बाबुराव गावडे याने तबलावादन क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. सोमवारी त्याने शिव तांडव स्त्रोत्रावर सलग आठ तास 25 मिनिटे तबला वाजवून ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया पॅसिफिक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले.
हा विक्रम कोल्हापूरातील शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन, विवेकानंद कॉलेज येथे पार पडला. सकाळी आठ वाजता कार्यक्रमाची सुरुवात आंबोलीचे माजी सरपंच प्रकाश गवस यांच्या हस्ते झाली. दिवसभर शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने गोविंदला प्रोत्साहन दिले.
संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सत्यजित कदम, प्राचार्या सौ. शुभांगी मुरलीधर गावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विक्रमाची अधिकृत नोंद प्रा. डॉ. महेश अभिमन्यू कदम यांनी केली. यावेळी गोविंदला रेकॉर्डच्या ट्रॉफ्या व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
गोविंद शिक्षण व खेळात प्राविण्य मिळवलेला असून, आता कलाक्षेत्रातही त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रमुख पाहुणे सत्यजित कदम यांनी हा विक्रम शाहूरायांच्या कलानगरीची ओळख वाढवणारा आहे असे गौरवोद्गार काढले.
विशेष म्हणजे, गोविंद हा गावडे कुटुंबीयांनी अनाथाश्रमातून तीन महिन्यांचा असताना दत्तक घेतलेला मुलगा आहे. त्याचे पालक बाबुराव व सविता गावडे यांनी त्याला संस्कार, शिक्षण आणि कलाप्रेम देऊन समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. सूत्रसंचालन नंदीनी शिंदे, ज्योती गडगे आणि पल्लवी हवालदार यांनी केले, तर आभार असिफ कोतवाल यांनी मानले.
भविष्यात संगीत क्षेत्रात पीएचडी करण्याचा मानस
गेली दिड वर्ष मी सलग चार ते पाच तास तबला वादनाचा सराव करत आहे. त्यासाठी मी योग्य व संतूलित आहार घेत आहे. मला आत्मविश्वास होता मी आठ तास वाजवू शकतो. भविष्यात संगीत क्षेत्रात पीएचडी करण्याचा माझा मानस आहे. आणि संगीताचे धडे नव्या पिढिला देण्यासाठी मला संगीत व तबला वादनाचे क्लासेस उघडायचे आहेत. संगीताचे वर्ग चालू करून आपले ज्ञान पुढच्या पिढीला देण्याचा माझा निर्धार आहे.
– गोंविद बाबुराव गावडे, तबला वादक








