नवी दिल्ली :
मार्च 2025 पर्यंत भारतामध्ये 3000 हून अधिक इलेक्ट्रिक प्रवासी वाहन चार्जिंग केंद्रे उभारण्याचा इरादा ग्लिडा या कंपनीने व्यक्त केला आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक अवदेशकुमार झा यांनी ही माहिती दिली आहे. ग्लिडाची सध्या भारतामध्ये 15 राज्यांमध्ये मिळून 450 चार्जिंग केंद्रे आहेत. त्यापैकी 170 चार्जिंग केंद्रे एकट्या दिल्लीत असून या पाठोपाठ नॅशनल कॅपिटल रिजनमध्ये 100 आणि हैदराबादमध्ये 80 चार्जिंग केंद्रे कार्यरत आहेत, असे झा यांनी सांगितले. आर्थिक वर्ष 2023 मध्ये ई प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये वर्षाच्या आधारावर पाहता 153 टक्के वाढ नोंदवली आहे. तर तीन चाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 118 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. एकंदर इलेक्ट्रिक वाहनांप्रती ग्राहकांचा वाढता कल लक्षात घेऊनच ग्लिडा कंपनीने नव्या चार्जिंग केंद्राच्या उभारणीचे उद्दिष्ट साकारण्याचे ठरवले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटापर्यंत 1000 चार्जिंग केंद्रे उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे.









