वृत्तसंस्था/ अहमदाबाद
ऑस्ट्रेलियाच्या धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल 4 नोव्हेंबरला होणार असलेल्या इंग्लंडविऊद्धच्या विश्वचषक सामन्यातून बाहेर पडला आहे. गोल्फ कार्टवरून पडल्याने त्याला दुखापत झाली आहे आणि चेहऱ्यावरही ओरखडे पडले आहेत. सोमवारी गोल्फच्या एका फेरीनंतर तो गोल्फ कार्टवर बसून जात होता तेव्हा पडून त्याला ही दुखापत झाली.
अष्टपैलू मॅक्सवेल हा ऑस्ट्रेलियन संघाचा एक महत्त्वाचा सदस्य आहे. कारण तो अॅडम झॅम्पाबरोबर फिरकी माऱ्याची जबाबदारी सांभाळतो आणि फलंदाजीच्या मधल्या फळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. गेल्या आठवड्यात दिल्लीत नेदरलँड्सविऊद्ध त्याने विश्वचषक इतिहासातील सर्वांत वेगवान शतकाची नोंद केली होती. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत मॅक्सवेलला अशा प्रकारे झालेली ही दुसरी इजा आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये त्याने मेलबर्न येथे वाढदिवसाच्या मेजवानीमध्ये पाय मोडून घेतला होता आणि वृत्तांनुसार, तो अद्याप त्यापासून पूर्णपणे ठीक झालेला नाही.









