वृत्तसंस्था/ दरबान
आयसीसीची 2023 सालातील विश्व चषक क्रिकेट स्पर्धा आता केवळ महिन्याच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. सदर स्पर्धा भारतामध्ये खेळविली जाणार आहे. या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघाने जोरदार तयारी केली आहे. दरम्यान या संघातील अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल दुखापतीच्या समस्येला तोंड देत आहे. दरबानमध्ये सराव शिबिरात मॅक्सवेलच्या घोट्याला ही दुखापत झाली आहे. या दुखापतीनंतर मॅक्सवेल आता मायदेशी रवाना झाला आहे. मॅक्सवेलची पत्नी सध्या गरोदर असून येत्या कांही दिवसांमध्ये या दांपत्याला पहिले अपत्य होणार आहे. मॅक्सवेलच्या या दुखापतीवर तातडीने वैद्यकीय इलाज करण्यात आला असून त्याला कांही दिवस विश्रांती घ्यावी लागेल. गेल्या वर्षभरामध्ये मॅक्सवेलला वारंवार दुखापतीच्या समस्यांना तोंड द्यावे लागले होते. मॅक्सवेलने आपल्या अष्टपैलू कामगिरीमध्ये सातत्य राखताना आतापर्यंत 128 वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व करताना 33.88 धावांच्या सरासरीने 3490 धावा जमविल्या आहेत. तसेच त्याने गोलंदाजीत 5.56 धावांच्या सरासरीने 60 गडी बाद केले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघामध्ये मॅक्सवेलचा संघातून वगळले असून त्याच्या जागी मॅथ्यू वेडचे पुनरागमन झाले आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी मॅक्सवेलसह स्ट्यूव स्मिथ, स्टार्क, कमिन्स, हॅझलवूड, ग्रीन आणि डेव्हिड वॉर्नर यांनाही संघात स्थान मिळालेले नाही.
ऑस्ट्रेलियन टी-20 संघ मिचेल मार्श (कर्णधार), अॅबॉट, टीम डेव्हिड, ड्वारशुईस, इलीस, हार्डी, हेड, इंग्लीस, जॉनसन, शॉर्ट, स्टोईनीस, टर्नर, मॅथ्यू वेड आणि अॅडॅम झाम्पा.









