मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात महाराजपूर नामक गाव आहे. येथे विदेही बाबा नामक सिद्ध पुरुषाचे एक पुरातन मंदीर आहे. या मंदिरात विषारी सर्पाचा दंश झालेल्या व्यक्तींनाही जीवनदान दिले जाते, अशी मान्यता आहे. हे मंदिर किती जुने आहे, हे निश्चितपणे कोणालाही माहीत नाही. तथापि, राजा-महाराजांच्या काळापासून ते प्रसिद्ध आहे, असे येथील पुरोहितांचे म्हणणे आहे.
पूर्वीच्या काळात एक राजा येथे आला होता. नंतर त्याने राज्यत्याग केला आणि तो येथील एकांतात वास्तव्य करु लागला. काही वर्षांनी या राजाने येथील वनप्रदेशात जिवंत समाधी घेतली. याच समाधीवर हे मंदीर स्थापन करण्यात आले आहे. येथे सर्पदंश झालेला कोणताही माणूस आला तरी तो निश्चितपणे बरा होतो, अशी मान्यता आहे. अनेकांनी तसा अनुभव आल्याचेही स्पष्ट केले आहे. या मंदिरात गेल्या 100 वर्षांपासून प्रतिवर्ष एक मेळा किंवा जत्रा भरते. या मेळ्याला जे भाविक येतात, त्यांच्यापैकी प्रत्येकाला मेळ्यात सहभागी होण्याआधी नारळ, पान आणि बत्तासा अर्पण करावा लागतो. नंतर मेळ्यासाठी आलेले भाविक विदेशी बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन घरी परततात. सर्पदंशावर उपचार करण्याची येथील पद्धतीही वेगळीच आहे. प्रथम अशा व्यक्तीला ‘जय विदेही बाबा’ असा घोष करावा लागतो. नंतर केसांची गाठ बांधावी लागते. नंतर तूप आणि मिरीचे चूर्ण यांचे मिश्रण त्याला खाण्यासाठी दिले जाते. मात्र पाणी मुळीच प्यायचे नाही असा नियम आहे. मिश्रण प्राशन केल्यानंतर मंदिराभोवती प्रदक्षिणा घालायची असते. त्यानंतर सापाचे विष उतरते असे प्रतिपादन मंदिराचे व्यवस्थापक करतात.









