जिल्हाधिकाऱयांना बेघरांचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या 30 ते 35 वर्षांपासून आम्ही भाडोत्री घरात राहात आहे. कुलीकाम, घरकाम तसेच स्वच्छतेचे काम करून उदरनिर्वाह करत आहे. तरी आम्हाला आवास योजनेंतर्गत घरे मंजूर करावीत, यासाठी अनेकवेळा निवेदन देण्यात आले आहे. मात्र, अजूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तेव्हा तातडीने आवास योजनेंतर्गत घरे मंजूर करावीत, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा समर्थनगरसह इतर परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदनाद्वारे दिला आहे.
घरे नसलेल्यांना घरे दिली जाणार, असे आश्वासन अनेक वेळा देण्यात आले आहे. झोपडपट्टी निर्मूलनासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अजूनही झोपडपट्टीमध्येच अनेक कुटुंबे रहात आहेत. त्यासाठी झोपडपट्टी निर्मूलन मंडळाकडेदेखील निवेदने दिली आहेत. बेळगाव महापालिकेने तर अनेक वेळा घरे मंजूर करावीत, यासाठी निवेदने दिली, मात्र अजून त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
आम्हाला तातडीने घरे मंजूर करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा समर्थनगरसह परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱयांना दिला आहे. यावेळी हनुमंत एल. टिकोळ, विलियन अम्माण्णा, यशोदा राजपूत, उमा मलदड, लक्ष्मी बागेवाडी, भारती घाडी, मेघराज घाडी, ज्योती जोसेफ, रोसिन्नत सय्यद, सलोनी यांच्यासह नागरिक व महिला उपस्थित होत्या.









