खानापूर तालुका विश्वकर्मा समाज संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
खानापूर : खानापूर तालुक्यातील विश्वकर्मा समाजाच्या नागरिकांना शासनाच्या आदेशानुसार टू-ए जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, तसेच नव्याने विश्वकर्मा समाजाचा जातीत उल्लेख करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन तालुका विश्वकर्मा समाज विकास ट्रस्टच्यावतीने तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना देण्यात आले. यावेळी अध्यक्ष अशोक सुतार, कार्याध्यक्ष महाबळेश्वर सुतार, उपाध्यक्ष परशराम सुतार, नारायण सुतार, प्रमोद सुतार, प्रभाकर सुतार, पांडुरंग सुतार यासह विश्वकर्मा समाजाचे बांधव उपस्थित होते. कर्नाटक सरकारने 2000 साली विश्वकर्मा समाजाचे टू-ए ओबीसी जातीमध्ये समावेश केलेला आहे. तालुक्यात मराठी बाहूल भागात विश्वकर्मा समाजाच्या दाखल्यात हिंदू मराठा असे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे विश्वकर्मा समाजातील विद्यार्थी तसेच समाजबांधवांना सरकारच्या योजनांचा लाभ मिळवण्यात येत नाहीत. सरकारच्या सुधारीत आदेशानुसार विश्वकर्मा समाजाच्या दाखल्याबाबत स्थानिक पातळीवर सर्वेक्षण तसेच चौकशी आणि पंचनामा करून टू-ए जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, असे 21-03-2018 रोजीच्या शासनाच्या आदेशात निर्देश दिले आहेत. मात्र स्थानिक पातळीवर विश्वकर्मा समाजातील बांधवांना टू-ए प्रमाणपत्र देण्यास अनेक अडचणी आहेत. यासाठी तहसीलदार कार्यालयाकडून शासनाच्या आदेशानुसार स्थानिक पातळीवर चौकशी करून तसेच नवीन विद्यार्थ्यांच्या दाखल्यात नमूद असलेल्या विश्वकर्मा जातीच्या आधारे समाजातील बांधवांना टू-ए प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी केली आहे. तसेच शासनाकडून विश्वकर्मा समाजासाठी देण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ समाजातील सर्व घटकांना द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी निवेदनाचा स्वीकार करून जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत योग्य त्या सूचना करू, असे आश्वासन विश्वकर्मा शिष्टमंडळाला दिले आहे.
विश्वकर्मा समाजाच्यावतीने आज मार्गदर्शन शिबिर
येथील विश्वकर्मा समाजाच्यावतीने विश्वकर्मा मंदिरात समाजबांधवांसाठी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्याबाबत तसेच शासकीय योजनांची माहिती देण्याबाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील सर्व विश्वकर्मा समाजबांधवांनी शनिवार दि. 14 रोजी करंबळ क्रॉस येथील विश्वकर्मा मंदिरात सकाळी 11 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी विश्वकर्मा मूर्तीवर अभिषेक व महापूजेचे आयोजन करण्यात आले असून यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे, असे आयोजकांकडून कळवण्यात आले आहे.









