जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : शहरातील सफाई कामगारांना घराचे हक्कपत्र देण्याचे आश्वासन यापूर्वी देण्यात आले. काही कामगारांना हक्कपत्र देण्यात आले. परंतु काही कालावधीने ते पुन्हा माघारी घेण्यात आले. सफाई कामगारांना हक्काची घरे मिळण्यासाठी हक्कपत्र आवश्यक आहे. अधिवेशनापूर्वी 253 कामगारांना हक्कपत्र न मिळाल्यास सुवर्णसौधसमोर आंदोलन करण्याचा इशारा सफाई कर्मचारी कावलू समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. बेळगाव महानगरपालिका हद्दीतील 253 निवासी घरांची मालकी हक्क मागील 40 वर्षांपासून राहणाऱ्या सफाई कामगारांच्या नावे करण्यात येणार आहे. यासाठी हक्कपत्र देणे गरजेचे आहे. 27 जुलै 2021 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कामगारांना निवासासाठी हक्कपत्र देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु यापैकी 11 कामगारांना हक्कपत्र देण्यात आले. काही कालावधीत ती पुन्हा माघारी घेण्यात आली. यामुळे सफाई कामगारांवर अन्याय होत असून त्यांना वेळीच न्याय देणे गरजेचे आहे.
अधिवेशनापूर्वी मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा
अधिवेशनापूर्वी मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा सफाई कर्मचारी संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. यावेळी अध्यक्ष मुनीस्वामी भंडारी, दीपक वाघेला, हिलोमीन कुंचम, विजय निरगट्टी, मालती सक्सेना, कुमार हरिजन, यल्लेश बळ्ळारी, अरुणा साके, रुक्मिणी बळ्ळारी यासह इतर उपस्थित होते.