राज्यसभा सदस्य कडाडींची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : बेळगाव-मिरज अनारक्षित एक्स्प्रेसच्या तिकीटाचा दर महाग असल्याने सर्वसामान्यांना तो परवडणारा नाही. त्यामुळे सामान्यांचा विचार करता कमी दरात रेल्वे प्रवास करण्यासाठी बेळगाव-मिरज अनारक्षित एक्स्प्रेसला पॅसेंजर रेल्वेचा दर्जा द्यावा, अशी मागणी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. खासदार कडाडी यांनी नुकतीच दिल्ली येथे रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन बेळगावचे रेल्वे प्रश्न मांडले. बेंगळूर-धारवाड वंदे भारतचा बेळगावपर्यंत विस्तार करावा. बेळगाव-मिरज रेल्वेला पॅसेंजर रेल्वे म्हणून घोषणा करावी. बेळगाव-मिरज रेल्वे सध्या तात्पुरत्या स्वरुपात चालविली जात असून ती कायमस्वरुपी करत पॅसेंजरचा दर्जा द्यावा, यामुळे तिकीट दर आपोआप कमी होतील, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.









