स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी : आश्वासनांची पायमल्ली, सरकारविरोधात निदर्शने
बेळगाव : शेतकऱ्यांना जाचक ठरणारे कृषी कायदे मागे घ्यावेत, शेतीमालाला आधारभूत किंमत निश्चित करावी, भू-सुधारणा व भू-संपादन कायदा रद्द करावा, बळ्ळारी नाल्याची स्वच्छता करावी, भातमालाला वाढीव हमीभाव मिळावा आदी मागण्यांसाठी कर्नाटक राज्य रयत संघ व हरित सेनेच्यावतीने शुक्रवारी कोंडुसकोप येथे आंदोलन छेडून शेतकऱ्यांनी सरकारविरोधात निदर्शने केली. शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, राज्याध्यक्ष चंद्रशेखर कोडीहळ्ळी उपस्थित होते.
सत्तेतील काँग्रेस सरकारने निवडणुकीदरम्यान शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकार स्थापन होऊन दोन वर्षांचा काळ उलटला तरी अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही. शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यास सरकार अयशस्वी ठरले आहे. मागील कित्येक वर्षांपासून बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांना शाप ठरलेल्या बळ्ळारी नाल्याच्या स्वच्छतेकडेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात शेकडो एकर परिसरातील शेती पिकांना फटका बसू लागला आहे. हलगा-मच्छे बायपाससाठी सुपीक जमिनीचे भू-संपादन झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या समस्या सरकारने तातडीने मार्गी लावाव्यात, अन्यथा येत्या काळात तीव्र लढा उभा करावा लागेल, असे विचार शेतकरी नेत्यांनी व्यक्त केले.
ऐन सुगी हंगामात भाताचे भाव घसरले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. भातमालाला योग्य भाव देऊन दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. सरकारने निवडणुकीदरम्यान दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. राज्यात ऊस उत्पादनात बेळगाव जिल्हा आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना योग्य भाव मिळावा, अन्यथा ऊस उत्पादक आंदोलन छेडणार असल्याची माहिती देण्यात आली.
शेतकऱ्यांच्या सहाव्या गॅरंटीकडे दुर्लक्ष : माजी खासदार राजू शेट्टी
सत्तेतील कर्नाटक सरकारने पाच गॅरंटी योजना जारी करून निवडणूक जिंकली. मात्र शेतकऱ्यांच्या सहाव्या गॅरंटीकडे दुर्लक्ष झाले आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. शुक्रवारी विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य रयत संघ-हरित सेनेतर्फे कोंडुसकोप येथे आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी होऊन राजू शेट्टी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सोयाबीन आणि इतर शेतीमाल कवडीमोलाने विकावा लागत आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम सत्तेतील काँग्रेस सरकार करू लागले आहे, असेही त्यांनी बोलताना सांगितले. हलगा-मच्छे बायपाससाठी सुपीक जमिनीचे भू-संपादन झाले आहे. त्यामुळे शेकडो एकरातील शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. राष्ट्रीय पक्ष निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांची भाषा करतात. मात्र सत्तेत आल्यावर दुर्लक्ष होते. देशातील तमाम शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. त्याचबरोबर लढा यशस्वी होण्यासाठी शेतकरी नेत्यांना ताकद द्यावी, अशी अपेक्षाही शेट्टी यांनी व्यक्त केली.









