हेस्कॉम तक्रार निवारण बैठकीत मागणी : मुख्य अभियंत्यांची उपस्थिती
बेळगाव : राज्य सरकारने सुरू केलेल्या गृहज्योतीचा लाभ घेताना भाडेकरूंना अनेक अडचणी येत आहेत. जुन्या भाडेकरूला मंजूर झालेल्या युनिट इतकीच मोफत वीज नव्या भाडेकरूला वापरावी लागत आहे. यामुळे गृहज्योतीचा लाभ मिळत नसल्याची तक्रार भाडेकरूंनी शनिवारी आयोजित हेस्कॉमच्या तक्रार निवारण बैठकीत केली. याबरोबरच इतर समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी हेस्कॉमकडून तक्रार निवारण बैठक बोलाविली जात आहे. शनिवारी रेल्वेस्टेशन येथे हेस्कॉम कार्यालयामध्ये शहर उपविभाग-1 व 2 ची बैठक पार पडली. हेस्कॉमचे मुख्य अभियंता प्रकाश व्ही. यांनी ग्राहकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्या तात्काळ दूर केल्या.
आदर्शनगर वडगाव येथील भाडेकरू अशोक पिराळे यांनी गृहज्योतीचा लाभ मिळत नसल्याची तक्रार दाखल केली होती. जुन्या भाडेकरूला मिळत असलेल्या गृहज्योतीचाच लाभ त्यांना मिळत आहे. अत्यंत कमी युनिटचा लाभ मिळत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. यासंदर्भात त्यांच्या विद्युतबिलाची तपासणी केल्यानंतर त्यांना वाढीव युनिट देण्यासंदर्भात चर्चा केली. याबरोबरच इतर भाडेकरूंनीही काही दिवसांपूर्वीच हेस्कॉमकडे तक्रार दाखल केली होती. अनगोळ येथील शेतकरी जिनाप्पा शहापूरकर यांनी आधार लिंक करणे का गरजेचे आहे? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच एमआरटी रिडिंग घेताना येत असलेल्या अडचणींबाबत तक्रारी दाखल केल्या. मुख्य अभियंत्यांनी सर्व ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेत प्रत्येकाला उत्तरे दिली. वडगाव येथील एका ग्राहकाने अधिक प्रमाणात अरिअर्स असल्याची तक्रार दाखल केली. नेहरुनगर येथील शहर उपविभाग-3 कार्यालयातही तक्रार निवारण बैठक पार पडली. यावेळी साहाय्यक कार्यकारी अभियंता संजीव हमण्णावर, संजीव सुखसारे, एम. शिंदे यांच्यासह हेस्कॉमचे कनिष्ठ कर्मचारी व ग्राहक उपस्थित होते.









