अंगणवाडी कर्मचारी संघटनेची मागणी
उत्रे प्रतिनिधी
उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी शासनाने प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी दिली आहे.मात्र अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी जाहीर केलेली नाही. खेडोपाडी वाड्यावस्त्यांवरील ३ ते ६ वयोगटातील बालके अंगणवाडीपर्यंत चालत येत असतात .उष्माघाताचा गंभीर परिणाम त्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यांनाही शासनाने उन्हाळी सुट्टी जाहिर करावी.तसेच बालकांच्या आहारात खंड पडू नये म्हणून त्यांना कोरडा खाऊ देण्यात यावा अशी मागणी जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाने आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अनेक ठिकाणी वाड्यावस्त्यांवर दुर्गम भागातील एकट्या सेविका अथवा मदतनीसेला अंगणवाडीत वसणे धोकादायक असते. काही ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष असते. त्यामुळे एकटया महिलेस या सर्व समस्यांना सामोरे जावे लागते. याचाही विचार करून या महिलांना अंगणवाडी बंद ठेऊन एकाचवेळी सुट्टी द्यावी अशी चर्चा केली होती. मात्र शासनाने आदेश काढून अंगणवाडीची वेळ बदलली. परंतु महिलां व बालकांना उष्माघाताच्या परिणामांना संरक्षण मिळणार नाही. तसेच मिनी अंगणवाडी सेविकांना शासन आदेश काढून ५ दिवस दिवाळीसाठी व १० दिवस उन्हाळयासाठी सुट्टी देण्याचा निर्णय घेतलाआहे. सुट्टीच्या कालावधीत आहारात खंड पडता कामा नये अशी अट आहे.त्यासाठी जवळच्या अंगणवाडी सेविका अथवा मदतनिसकडे अतिरिकत कार्यभार दयावा अशा सुचना केल्या आहेत. सुट्टीच्या कालावधीत दुसऱ्या अंगणवाडीत एकच सेविका अथवा मदतनिस असताना तिला अतिरीक्त कार्यभार दिला आहे. यामुळे दोन्ही अंगणवाड्यांचे कामकाज कसे काय करता येणार? या सर्व समस्यांचा विचार करता.अंगणवाडी केंद्रे बंद ठेऊन लाभार्थी व कर्मचारी यांना सुट्टी देऊन कोरडा खाऊ पुरविण्यात यावा असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष अतूल दिघे , सचिव सुवर्णा तळेकर,जुलेखा मुजावर ,धो़डीबा कुंभार , छाया तिप्पट,विद्या पाटील ,लता कदम ,उषा कडोकर, बिस्मिल्ला शिकलगार ,कल्पना पिलारे आदी उपस्थित होत्या.









