नरेंद्र मोदी-मोहम्मद युनूस भेटीत हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित : संबंधांना हानी पोहोचवणारी विधाने टाळण्याचा सल्ला
वृत्तसंस्था/ बँकॉक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्याशी चर्चा केली. बँकॉकमध्ये झालेल्या बिमस्टेक शिखर परिषदेच्या वेळी दोन्ही नेत्यांची भेट झाली. याप्रसंगी युनूस यांच्यासमोर बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करतानाच बांगलादेशात लवकर निवडणुका घेण्याचे आवाहन केले. तसेच द्विपक्षीय संबंधांना हानी पोहोचवू शकणारी विधाने टाळण्यासही त्यांनी सांगितले आहे.
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी मोदी-युनूस भेटीबद्दल माहिती दिली. निवडणुका लोकशाहीचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहेत. बांगलादेश लवकरच लोकशाही आणि स्थिर सरकार पाहील, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. दोन्ही नेत्यांमध्ये बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या स्थितीवरही चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी हा मुद्दा उघडपणे उपस्थित केला. बांगलादेश सरकार आपल्या जबाबदाऱ्या पार पाडेल, असे आश्वासन युनूस यांनी दिले. थायलंडमध्ये झालेल्या बिम्सटेक शिखर परिषदेच्या बाजूला दोन्ही नेत्यांनी ही भेट घेतली. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तापालटानंतर पंतप्रधान मोदी आणि मोहम्मद युनूस यांची भेट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. युनूस यांनी पदभार स्वीकारल्यापासून भारत आणि बांगलादेशमध्ये तणाव आहे.
वातावरण बिघडवणारे भाषण टाळावे!
वातावरण बिघडवू शकणारे कोणतेही वक्तव्य टाळले पाहिजे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दोन्ही देशांमधील परस्पर हिताचे सर्व मुद्दे दोन्ही देशांमधील दीर्घकालीन द्विपक्षीय संबंधांच्या हितासाठी रचनात्मक चर्चेद्वारे द्विपक्षीय पद्धतीने सोडवले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी लोकशाही, स्थिर, शांततापूर्ण, प्रगतीशील आणि समावेशक बांगलादेशला भारताचा पाठिंबा राहील असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले. सीमेवर सीमा सुरक्षा आणि स्थिरता राखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी आणि बेकायदेशीर सीमा ओलांडण्याला प्रतिबंध करणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले. हसीना यांचे प्रत्यार्पण आणि बांगलादेशात निवडणुका घेण्यावरही चर्चा झाली. कोणत्याही लोकशाहीसाठी महत्त्वाच्या आणि भविष्यात स्थिर बांगलादेश सुनिश्चित करणाऱ्या नियमित आणि समावेशक निवडणुका घेण्याबाबत त्यांनी युनूस यांच्याशी आपले विचार मांडले.
बिम्सटेक डिनरमध्ये दोन्ही नेते एकत्र
यापूर्वी, दोन्ही नेते गुरुवारी रात्री बिम्सटेक डिनरमध्ये एकत्र दिसले होते. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी दोघांमध्ये बैठक झाली. पंतप्रधान मोदी यांनी बिम्सटेक देशांच्या सहाव्या शिखर परिषदेतही भाग घेतला. यावेळी त्यांचे स्वागत थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांनी केले. सुरुवातीला मोदी यांनी म्यानमारचे लष्करी नेते जनरल मिन आंग यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला. भारत म्यानमारला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
वाट फो मंदिराला भेट
बिम्सटेक परिषदेनंतर पंतप्रधान मोदींनी थायलंडमधील ऐतिहासिक वाट फो मंदिराला भेट दिली. येथे पंतप्रधानांनी बौद्ध भिक्षूंची भेट घेतली आणि मंदिरात प्रार्थना केली. वाट फो मंदिर बँकॉकमध्ये असून ते त्याच्या प्रचंड झोपलेल्या बुद्ध मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. वाट फो हे थायलंडमधील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. येथे 1,000 हून अधिक बुद्ध मूर्ती आणि 90 हून अधिक स्तूप आहेत.









