काँग्रेस पक्षाची मागणी
प्रतिनिधी /पणजी
मोपा विमानतळ प्रकल्पासाठी जमीन गेलेल्या जमीनमालकांना सुयोग्य भरपाई कायदा लागू करून त्यांना योग्य अशी भरपाई किंवा सरकारी नोकरी देण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केले आहे. मोपा पिडीत शेतकऱयांना कवडीमोल दराने भरपाई दिल्याचा आरोपही पक्षाने केला आहे.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते संजय बर्डे यांनी सांगितले की केंद्र सरकारचा सुयोग्य भरपाई कायदा सरकारी प्रकल्पांसाठी जमीन गेलेल्या मालकांसाठी महत्त्वाचा आहे. परंतु गोवा सरकारने त्याची अधिसूचनाच काढलेली नाही. त्यामुळे सरकारी प्रकल्पात ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना या कायद्याप्रमाणे भरपाई मिळाली नाही. परिणामी त्यांचे मोठे नुकसान झाले असून जमीनही गेली, नोकरी नाही आणि कवडीमोल भरपाई अशी त्यांची केविलवाणी अवस्था झाली आहे.
मोपा विमानतळासाठी जीएमआर कंपनीने सर्व जमीन ताब्यात घेतली असून त्याचे भूसंपादन झाल्यानंतर सदर कायद्याच्या तरतुदीनुसार सरकारने भरपाई दिली नाही अशी तक्रार श्री. बर्डे यांनी केली आहे. सरकारने त्याप्रमाणे जर भरपाई दिली नाही तर मोपा विमानतळ पिडीत सर्व शेतकरी, जमीनमालकांना एकत्र आणून संघटीत करून कायदेशीर- सनदशीर मार्गाने लढा देण्याचा इशारा काँग्रेस नेते श्रीनिवास खलप यांनी दिला आहे. मोपा विमानतळ प्रकल्पात पेडणेकरांना नोकऱया दिल्या हा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा दावा खोटा असल्याचे श्री खलप यांनी नमूद केले.









