सफाई कामगार हितरक्षण समितीची मनपा आयुक्तांकडे मागणी
बेळगाव : शहर स्वच्छतेचा ठेका बेंगळूर येथील एका कंपनीला देण्यात आला आहे. त्यामुळे 300 सफाई कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीवर भरती करून घेतली जाणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना मॅन्युअल स्कॅव्हेंजरचे काम करणाऱ्या कुटुंबीयांच्या मुलांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन सफाई कामगार हितरक्षण समितीच्यावतीने मनपा आयुक्त शुभा बी. यांना मंगळवारी देण्यात आले. महापालिकेकडून शहर स्वच्छतेचा ठेका बेंगळूर येथील एका कंपनीला देण्यात आला असल्याने लवकरच नवीन ठेकेदारांकडून शहर स्वच्छतेचे काम सुरू केले जाणार आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये बेळगाव शहरात 386 कुटुंबे मॅन्युअल स्कॅव्हेंजर म्हणून ओळखली गेली आहेत. कायद्यात असलेल्या तरतुदीनुसार सदर कुटुंबीयांच्या मुलांना नोकरीत सामावून घेणे गरजेचे आहे.
त्यामुळे नवीन ठेकेदारांकडून सफाई कामासाठी 300 सफाई कर्मचाऱ्यांची भरती करून घेतली जाणार आहे. सदर भरती प्रक्रिया राबविताना मॅन्युअल स्कॅव्हेंजरचे काम करणाऱ्या कुटुंबातील मुलांना प्रथम प्राधान्य द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन स्वीकारल्यानंतर मनपा आयुक्त शुभा बी. म्हणाल्या, सर्वच मुलांची सफाई कर्मचारी म्हणून भरती करून घेण्याऐवजी ज्यांचे शिक्षण झाले आहे त्यांना सुपरवायझर किंवा तत्सम दर्जाचे पद देण्याबाबत विचार होईल. तर कमी शिक्षण झालेल्यांना सफाई कर्मचारी म्हणून भरती करून घेतले जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी प्रशासन उपायुक्त विजयकुमार तळवार, सफाई कर्मचारी हितरक्षण समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक दीपक वाघेला, सचिव विजय निरगट्टी यांच्यासह पदाधिकारी व मॅन्युअल स्कॅव्हेंजरचे काम करणारे कुटुंबीय उपस्थित होते.









