पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकांना आवाहन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या नागरीकांनी विदेशी वस्तू खरेदी करण्याचा मोह टाळून स्वदेशनिर्मित वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. स्वदेशनिर्मित वस्तूंची अधिकाधिक प्रमाणात खरेदी झाल्यास देशातच तंत्रज्ञान विकासाला बळ मिळेल आणि देश कोणत्याही अन्य देशांवर अवलंबून न रहाता अधिक झपाट्याने विकसीत होईल, असे प्रतिपादनही त्यांनी मंगळवारी केले.
अत्यंत साध्या बाबींपासून नागरीक स्वदेशनिर्मित वस्तूंच्या खरेदीला प्रारंभ करु शकतात. होळी, दिवाळी आणि गणेशोत्सव हे देशभर साजरे केले जाणारे सण आहेत. या सणांना जी साधने लागतात, ज्या मूर्तींची पूजा केली जाते, त्यांची निर्मिती भारतात होते. नागरीकांना आवर्जून केवळ भारतातच निर्माण झालेली अशी साधने विकत घेण्याचा निर्धार केल्यास भारतातील छोटे उद्योजक, कारागिर, मूर्तीकार आणि शेतकरी यांना मोठे पाठबळ मिळू शकते. तसेच देशाचा पैसा यामुळे विदेशांकडे जाणार नाही. याचा लाभ देशाच्या अर्थव्यवस्थेला होऊन ती अधिक बळकट होईल. तेव्हा भारतीय नागरीकांनी स्वदेशनिर्मित वस्तू आणि स्वदेशनिर्मित तंत्रज्ञान यांचे महत्व ओळखून त्यांना प्राधान्य द्यावे, अशी सूचना त्यांनी केली.
विदेशी वस्तूंची भरमार
भारताच्या बाजारांमध्ये आज विदेशी वस्तूंची भरमार दिसून येते. अगदी साध्या वस्तूही विदेशांमधून येतात. गणेशोत्सवात ज्या गणेश मूर्तींची पूजा केली जाते. त्या मूर्तीही परराष्ट्रांमधून येतात. या मूर्ती आपल्या शैलीतील असतही नाहीत. त्यांचे डोळे अगदीच मिचमिचे असतात. तरीही त्यांची खरेदी केली जाते, ही बाब योग्य नाही. आपले मूर्तीकार यापेक्षा निश्चितच अधिक सुंदर मूर्ती निर्माण करतात. आपल्या मूर्तीकारांनी केलेल्या मूर्तींची खरेदी करण्याला आपण प्राधान्य द्यावयास हवे. तरच देशाची अर्थव्यवस्था सुदृढ होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
स्वस्त माल भारतात
चीनकडून भारतात त्याचा स्वस्त माल खपविला जातो. यातून चीनला प्रचंड लाभ होतो. वस्तू खरेदी करताना भारतीय नागरीक याचा फारसा विचार करीत नाहीत. त्यामुळे देशाचा पैसा मोठ्या प्रमाणात देशाबाहेर जाऊन अर्थव्यवस्थेची मोठी हानी होते. चीन भारतातून मिळविलेल्या प्रचंड पैशाचा उपयोग भारताच्याच विरोधात करीत आहे. त्यामुळे भारताच्या नागरीकांनी स्वदेशीचे अर्थशास्त्र जाणले पाहिजे. ज्या वस्तू भारतात निर्माण होतात, त्यांची खरेदी भारतीयांनी केल्यास मोठ्या प्रमाणात आपली अर्थव्यवस्था विदेशी प्रभावातून मुक्त होऊ शकते, अशी सूचना अनेक तज्ञांनीही केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच हेतूने नागरीकांना हे महत्वाचे आवाहन केलेले आहे.









