एसडीएमसीची गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : कडोली येथील सरकारी मराठी मॉडेल स्कूल येथे कायमस्वरुपी मुख्याध्यापक नसल्याने याचा परिणाम शाळेवर होत आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रभारी मुख्याध्यापकांवरच शाळा चालविली जात आहे. त्यामुळे यापुढील कौन्सिलिंगवेळी शाळेला कायमस्वरुपी मुख्याध्यापक तसेच दोन साहाय्यक शिक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी शाळा सुधारणा समितीच्यावतीने मंगळवारी ग्रामीण विभागाच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. सरकारी मॉडेल स्कूलमध्ये 340 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या याठिकाणी 11 शिक्षक सेवा देत असून विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या कमी आहे. तसेच यातील काही शिक्षक निवृत्त होणार असल्याने त्यापूर्वीच शिक्षण विभागाने दोन साहाय्यक शिक्षक द्यावेत. कायमस्वरुपी मुख्याध्यापक नसल्याने प्रभारींवर जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु याचा परिणाम शाळेच्या दर्जावर होत आहे. सरकारी शाळा उत्तम प्रकारे सुरू असल्याने शिक्षण विभागाने मुख्याध्यापक व साहाय्यक शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी शाळा सुधारणा समितीने केली आहे. ग्रामीण गटशिक्षणाधिकारी दासप्पन्नावर यांनी निवेदन स्वीकारून येत्या कौन्सिलिंगमध्ये कायमस्वरुपी मुख्याध्यापक देण्यासंदर्भात आश्वासन दिले. यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष अजित डंगरले, सदस्य नागेंद्र पाटील, विजय बसरीकट्टी, राजू उच्चूकर यांसह महिला सदस्या उपस्थित होत्या.









