विजय सरदेसाई : गुंडांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आगरवाडेकर कुटुंबियांना येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वी मालकी हक्क मिळवून द्यावा, हल्लेखोर गुडांना तात्काळ अटक करावी तसेच या प्रकरणात गुंडांना पाठीशी घालणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे, अशी जोरदार मागणी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली. गोवा फॉरवर्ड पक्षाच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार सरदेसाई यांनी आसगाव येथील घटनेवरून तीव्र संताप व्यक्त केला. आगरवाडेकर कुटुंबियांपैकी प्रियंशा आगरवाडेकर, प्रिन्सी आगारवाडेकर उपस्थित होत्या.
आमदार सरदेसाई म्हणाले, आसागाव येथील घटनेला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. कारण आसगाव येथील घटना घडण्याचे कृत्य हे पोलिसांचे अभय व राजकीय पाठबळ मिळाल्याशिवाय शक्य नाही. पोलिसांनी गोमंतकीय कुटुंबियांची बाजू न घेता गुंडांनाच अभय देण्याचा जो प्रयत्न चालवला त्याचे सर्व व्हिडियो व्हायरल झाले आहेत. पोलिसांकडून आगरवाडेकर कुटुंबियांना मदत करण्याऐवजी गुंडांना सहकार्य केल्याची घटना घडूनही पोलिस खात्याने या घटनेची दखल घेतलेली नाही. यामध्ये पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक या दोघांचाही समावेश आहे, असेही ते म्हणाले.
…तरच सर्वसामान्यांचे सरकार म्हणून सिद्ध होईल!
राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) येणाऱ्या राज्यांत गुंडाराज चालते. हे गुंडाराज आता गोव्यात पसरत आहे. कुणीही यावे गोमंतकीयांची घरे बळकावीत, त्यांना मारहाण करावी हे प्रकार सरकारच्या पाठबळाशिवाय शक्य नाहीत. जर सरकारचा किंवा पोलिसांचा यामध्ये समावेश नसेल तर त्यांनी गुंडांना त्वरित अटक करावी तसेच गुडांना मदत करणाऱ्या पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक या अधिकाऱ्यांनाही निलंबित करावे. तरच भाजपचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार म्हणून सिद्ध होईल, असेही सरदेसाई म्हणाले.
‘सबका साथ, सबका विकास’ नेमका कुणाचा?
‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा मुख्यमंत्री सावंत न चुकता कार्यक्रमांमध्ये देतात. परंतु, त्यांनी हा विकास नेमका कुणाचा हे जनतेसमोर स्पष्ट करण्याची गरज आहे. कारण आज गोव्यात गोमंतकीयांना मारहाण करून बेघर करणाऱ्या घटना घडत आहेत. राज्यात निधी मिळविण्याच्या नावावार गैरकृत्यांचे प्रमाण वाढलेले आहे. अमली पदार्थासारख्या घटनांनी तर गोवा बदनाम होत आहे. या सर्व घटनांमध्ये दिल्लीसारख्या राज्यातील काही लोक गुंतल्याचे पुढे येऊनही त्यांच्यावर कारवाईचे करण्यास सरकार धजावत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री सावंत हे खरोखरच ‘नीज गोंयकारां’चे संरक्षण करत असतील तर त्यांनी आसगाव येथील पीडित आगारवाडेकर कुटुंबियांना पूर्णपणे मालकी हक्क मिळवून द्यावा, गुंडांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली.