केंद्रीय मत्स्योद्योग राज्यमंत्री रुपाला यांची माहिती :गोव्याच्या सागरी पर्यावरणाचे भान ठेवून मासेमारी करावी
मडगाव : गोव्यात मत्स्योद्योगात पुरुष मासे पकडण्याच्या कामात, तर महिला मासळीविक्रीच्या कामात हातभार लावत असल्याचे आपणास सागर परिक्रमेदरम्यान लक्षात आले. काहींनी महिलांचा अधिक हातभार लागावा यासाठी प्रस्ताव मांडल्याने मत्स्योद्योगात कार्यरत असलेल्या महिलांच्या गटांना निर्यातीच्या क्षेत्रात वाव देण्याच्या दृष्टीने विचार होऊ शकतो, असे प्रतिपादन पेंद्रीय मत्स्योद्योग राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी केले. लहान आणि मोठे मच्छीमार असा दुजाभाव न करता सर्वांचे हित जपत तसेच गोव्याच्या सागरी पर्यावरणाचे भान ठेवत मासेमारीचा व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी सर्वांनी झटावे, असे आवाहन मंत्री रुपाला यांनी मडगावातील पत्रकार परिषदेत बोलताना केले. इंधनावर थेट जीएसटी तसेच अबकारी कर कपात देण्याची मागणी मच्छीमारांकडून करण्यात आली असता त्यावर सर्वांना विश्चासात घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्ड स्टोअरेजची गरज : व्हिएगस
बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस आणि वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यावेळी उपस्थित होते. आमदार व्हिएगस यांनी मासेमारी केल्यानंतर पकडलेली मासळी साठवून ठेवण्यासाठी कोल्ड स्टोअरेजची गरज व्यक्त केली. बाणावलीत अशा तीन कोल्ड स्टोअरेजची गरज असल्याचे त्यांनी मंत्र्यांच्या नजरेस आणून दिले. यावेळी पारंपरिक मच्छीमारांच्या वतीने मागण्यांचे एक निवेदन व्हिएगस यांनी मंत्र्यांना सुपूर्द केले. राज्याचे मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी मंत्री रुपाला हे मत्स्योद्योग खाते चांगल्या पद्धतीने हाताळत असल्याचे सांगितले. केंद्राकडून राबविण्यात येणारी पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना तसेच किसान क्रेडिट कार्डमार्फत मिळणाऱ्या सुविधा यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
पायाभूत सुविधांसाठी पूर्ण सहकार्य
गोव्यात जेटी, बंदर, पार्किंगसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या बाबतीत पूर्ण सहकार्य केले जाणार असल्याचे मंत्री रुपाला यांनी सांगितले. मत्स्योद्योगावर भर देण्यासाठी पंतप्रधानांनी वेगळा विभाग बनविलेला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सागर परिक्रमा राबविण्यामागचा हेतू प्रत्यक्षात मच्छीमारांच्या समस्या जाणून घेऊन त्या राज्य व केंद्रातील अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून सोडविणे तसेच केंद्र सरकारच्या योजना मच्छीमारांपर्यंत पोहोचविणे हा आहे, असे त्यांनी सांगितले. किसान कार्डचा लाभ आता मच्छीमारांनाही मिळत आहे. गोव्यातील सर्व मच्छीमारांनी किसान कार्ड करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. या कार्डच्या अंतर्गत 1.60 लाखांपर्यंतचे कर्ज कोणत्याही कटकटीविना काढता येते. 7 टक्के व्याजदराने हे कर्ज मिळते. जर कर्जदार प्रत्येक हप्ता न चुकता भरत असल्यास 3 टक्के व्याज केंद्र सरकार स्वत: भरते. अशा प्रकारे 4 टक्क्यांवर हे कर्ज मिळते, असे खासदार विनय तेंडुलकर यांनी यावेळी नजरेस आणून दिले.









