महिला संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन : राज्य सरकारचा निषेध : निर्णय मागे घेण्याची मागणी
बेळगाव : देशभरात गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. तर राज्य सरकार गावागावात मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्यासाठी पुढाकार घेत आहे. याला विरोध करत महिला संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. सरकारने घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली. दारू नको दूध द्या, बिअर नको पाणी द्या, अशा घोषणाही देण्यात आल्या. मद्य निषेध आंदोलन आणि ग्रामीण कुलीकामगार संघटना यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. गांधी जयंतीनिमित्त हे आंदोलन रविवारपासून सुरू आहे. सोमवारी मोठ्या संख्येने महिला जमून राज्य सरकारच्या मद्य विक्री धोरणाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये मद्य विक्री दुकान सुरू करण्यासाठी सरकारकडून परवानगी दिली जात आहे. तसे केल्यास समाजात अशांतता निर्माण होईल. ग्रामीण भागातील तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन तरुणपिढी बरबाद होईल. सरकार एकीकडे विकासाच्या योजना राबवून मदत करत आहे तर ग्रामीण भागामध्ये मद्य विक्रीची दुकाने सुरू करून जनतेला व्यसनाच्या खाईत लोटत आहे.
अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन
राज्य सरकारने मद्य विक्री दुकानांना कोणत्याही परिस्थितीत परवानगी देवू नये, अन्यथा या विरोधात राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
सरकारच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध
व्यसनाच्या आहारी गेल्याने अनेक कुटुंबांची वाताहत झाली आहे. महिला विधवा बनल्या आहेत. कुटुंबातील कर्ता पुरूष व्यसनाधिन झाल्याने मुलांच्या शिक्षणाची अधोगती झाली आहे. कुटुंब व समाजातील शांतता नाहीशी झाली आहे. व्यसनाधिनता मोठ्या प्रमाणात वाढत असताना सरकारने गाव पातळीवर मद्यविक्री दुकान सुरू करण्याचा घेतलेला निर्णय समाजासाठी मारक आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावा, अन्यथा राज्यभरात महिला संघटनांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्dयातील विविध तालुक्यातून आलेल्या महिलांनी राज्य सरकारच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे.









