डोवाल यांचे विदेशी वृत्तमाध्यमांना जाहीर आव्हान
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारतातील पहलगाम येथे क्रूर आणि धर्मांध दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या ‘सिंदूर’ अभियानात पाकिस्तानची अतोनात हानी झाली आहे. त्यांचे किमान 13 वायुतळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. भारताची मात्र, हानी झालेली नाही. तथापि, पाश्चिमात्य वृत्तमाध्यमांनी भारताची मोठी हानी झाली, असा अपप्रचार चालविला आहे. त्यांनी यासंदर्भातील एक तरी ठोस पुरावा द्यावा, असे जाहीर आव्हान भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिले आहे.
ते शुक्रवारी आयआयटी मद्रास या संस्थेने आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात भाषण करीत होते. भारताने यशस्वी केलेल्या अभियानात पाकिस्तानची मोठी हानी झाली, याचे अनेक पुरावे आहेत. अनेक उपग्रहीय छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. तसेच अनेक खासगी उपग्रह, ज्यांच्यावर भारताचे नियंत्रण नाही, अशा उपग्रहांनी पाठविलेली छायाचित्रेही उपलब्ध आहेत. या छायाचित्रांनी पाकिस्तानची किती मोठी हानी झाली, हे स्पष्टपणे सिद्ध केले आहे. मात्र, पाकिस्तानने भारताची हानी केल्याचा एकही पुरावा आजवर समोर आलेला नाही. त्यासंदर्भातील एकही छायाचित्र कोणत्याही संस्थेने पुढे आणलेले नाही. असे असूनही विदेशी वृत्त माध्यमे भारताविरोधात अपप्रचार करीत आहेत. कोणाची तरी राजकीय तळी त्यांच्याकडून उचलून धरली जात आहे. तथापि, कितीही अपप्रचार केला, तरी सत्य लपलेले नाही. ते जगासमोर आलेलेच आहे, अशी ठोस मांडणी आपल्या भाषणात अजित डोवाल यांनी केली आहे.
अपप्रचाराचे कारण
काही विदेशी वृत्तपत्रे आणि वृत्त माध्यमे भारताला नेहमीच पाण्यात पाहतात. भारत विरोधी देशांची तळी उचलण्याचे काम ती करतात. ‘सिंदूर’ अभियान यशस्वी झाल्याने या वृत्त माध्यमांची कोंडी झाली आहे. त्यामुळे भारताचे श्रेय हिरावून घेण्यासाठी ही माध्यमे अपप्रचार करीत आहेत. हा भ्रष्ट वृत्तप्रसारणाचा एक प्रकार आहे. मात्र, अशा अपप्रचारावर आता लोकांचा विश्वास बसत नाही. कारण भारताने आपल्या प्रत्येक हल्ल्याचा ठोस पुरावा सादर केला आहे. तो या पंचमस्तंभी माध्यमांना नाकारता येत नाही. त्यामुळे ते भारताची हानी झाल्याचा अपप्रचार करुन सत्य लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. मात्र, तो यशस्वी होणार नाही, कारण लोक शाहणे आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.









