महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची मागणी
बेळगाव : प्राध्यापक होण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या के-सेट परीक्षेमधून मराठी विषयाला वगळण्यात आले आहे. यामुळे बेळगाव, धारवाड व गुलबर्गा येथे मराठी विषयातून एमए केलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय झाले आहे. एकीकडे कर्नाटक सरकारकडून कन्नडसक्ती सुरू असतानाच दुसरीकडे के सेटसारख्या महत्त्वाच्या परीक्षेतून मराठीला डावलण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या आकांक्षेवर गंभीर परिणाम होणार आहे. यामुळे त्वरित त्यात बदल करून मराठीचा समावेश करण्याची मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठासह गुलबर्गा व धारवाड या विद्यापीठांमध्ये अंदाजे 2 हजार विद्यार्थी मराठी विभागातून एमए तसेच पीएचडी पदवी घेत आहेत. परंतु मराठीला वगळण्यात आल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना धक्का बसला. कर्नाटक परीक्षा मंडळाने शुक्रवारी के-सेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. इच्छुक विद्यार्थ्यांना 19 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु परीक्षा मंडळाने विषयाच्या यादीतून मराठी वगळल्याचे दिसून आले.
तीन विद्यापीठांमध्ये मराठी विषय शिकविला जात असतानाही परीक्षेतून वगळण्यात आले. इतिहास, समाजशास्त्र, भूगोल, हिंदी, शारीरिक शिक्षण, गृहविज्ञान, संगीत आदी विषय मागील वर्षाप्रमाणे यंदाही पूर्ववत ठेवण्यात आले आहेत. मात्र यातून मराठीला वगळण्यात आल्याने प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्येमध्ये भर पडली आहे. तरी परीक्षा मंडळाने तात्काळ मराठीचा समावेश करावा, अशी मागणी केली जात आहे.
प्राध्यापक होण्यासाठी के-सेट परीक्षा महत्त्वाची असून वर्षातून एकदाच घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून यावर्षीही के-सेट परीक्षेत मराठीचा समावेश करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, सरचिटणीस श्रीकांत कदम, विनायक कावळे, सूरज कुडूचकर, किरण हुद्दार, संतोष कृष्णाचे, अॅड. वैभव कुट्रे, शेखर तलवार, शांताराम होसूरकर, सूरज चव्हाण, अॅड. अश्वजित चौधरी आदी उपस्थित होते.









