सत्यपाल मलिकांचे वक्तव्य : राहुल गांधींवर विश्वास संपला
वृत्तसंस्था/ लखनौ
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडी आघाडीच्या नेतृत्वावर स्वत:चा दावा केला आहे. तर काँग्रेसची यामुळे चांगलीच कोंडी झाली आहे. परंतु समाजवादी पक्ष आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ममतांच्या नावाला समर्थन दिले आहे. याचदरम्यान माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही स्वत:चे मत व्यक्त केले आहे. इंडी आघाडीचे सर्व पक्ष ममता बॅनर्जी यांना स्वत:च्या नेत्या म्हणून समोर आणत असतील तर निश्चितपणे ही आघाडी यशस्वी ठरले. ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे हे आघाडीसाठी सर्वात चांगले नेते असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.
इंडी आघाडीचे विविध पक्ष स्वत:चे नेतृत्व आणि निवडणूक रणनीतिंवर विचार करत असताना मलिक यांनी हे वक्तव्य केले आहे. सद्यस्थितीत इंडी आघाडीसाठी सर्वात मजबूत नेता कुणी असेल तर त्या ममता बॅनर्जीच आहेत. इंडी आघाडीसाठी सर्वात चांगले नेतृत्व त्या देऊ शकतात असे मलिक यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ने ममता बॅनर्जी यांच्या दाव्याला समर्थन दिले आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख एक सक्षम नेत्या असून त्यांना विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद भूषवत असताना विरोधी पक्षांच्या आघाडीच्या संचालनाची जबाबदारीही पार पाडू शकते असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते. हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव आणि विविध प्रादेशिक पक्षांमधील असंतोषामुळे विरोधी पक्षांच्या आघाडीतील मतभेद समोर आले असताना ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य केले होते. आता सर्व नजरा काँग्रेसच्या भूमिकेवर लागून राहिल्या ओत. कारण प्रमुख विरोधी पक्ष अदानी आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर निदर्शनांसमवेत अनेक मुद्द्यांवर संसदेत एकाकी पडत असल्याचे चित्र आहे. अनेक प्रादेशिक पक्ष याप्रकरणी काँग्रेसपासून दूर राहत आहेत.









